उन्हाळी भेंडी लागवड तंत्र

उन्हाळी भेंडी लागवड तंत्र

भेंडी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे व्यापारी पीक आहे. भेंडीच्या वेगवेगळया अनेक प्रजाती उपलब्ध असून‍ सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या देशांमध्ये अग्रेसर आहे. भेंडीमध्ये आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक विविध जीवसत्वे, लोह तसेच खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने वर्षभर चांगली मागणी असते. यामुळे उन्हाळी हंगामात भेंडी लागवड केल्यास चांगल्या प्रकारे उत्पादन मिळण्याची शक्यता अधिक असते शिवाय इतर भाजीपाला पिकाच्या तुलनेत भेंडी हे कमी नाशवंत असून जास्त काळ टिकू शकते. बाजारभाव सुद्धा चांगला मिळतो, म्हणून उन्हाळी हंगामात भेंडी लागवड करणे अधिक फायदेशीर ठरते.

उन्हाळी भेंडी लागवड तंत्र या लेखामध्ये आपणास उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड कशी करावी, हवामान व जमीन कसे असावे, भेंडीच्या जाती, दर्जेदार बियाणे कोणते वापरावे, भेंडी लागवड कोणत्या पद्धतीने करावी, भेंडीवरील कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन, भेंडीची तोडणी कशी करावी व उत्पादन किती मिळते या विषयी सविस्तर व उपयुक्त माहिती मिळणार आहे.

हवामान कसे असावे ?

‍भेंडी पिकाला उष्ण, दमट हवामान चांगले मानवते. सरासरी 22-25 अंश सेल्सिअस तापमानात वाढ चांगली होते, शिवाय भेंडीला जास्त थंडी सहन होत नसून 20 अंशापेक्षा कमी तापमानात उगवण कमी होते. जास्त तापमान आणि कमी आर्द्रता काळात भेंडीची वाढ मंदावते. वातावरणातील थंडी कमी असल्यास वर्षभर कधीही भेंडीची लागवड करता येते, परंतु दमट हवामानात भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.

जमीन कोणती निवडावी ?

भेंडीचे पीक हलक्या, मध्यम व भारी जमिनीत चांगला प्रकारे घेता येते. शिवाय पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी. कोणत्याही क्षारयुक्त किंवा चोपण जमिनीत भेंडीची लागवड करू नये. 

हंगाम कसा असावा ? 

भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. अधिक उत्पादनासाठी खरीप व उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरते. उन्हाळी हंगाम- जानेवारीच्या दुसरा ते तिसरा आठवडा ते मार्च पर्यंत करावी. लागवडीस उशिर झाल्यास किंवा पाणी देण्याची सोय असल्यास भेंडीचे उत्पादन चांगले मिळते.

भेंडी लागवड कशी करावी ?

  • सुरुवातीस मशागतीमध्ये एकदा चांगली नांगरणी करावी. त्यानंतर २-३ कुळवणी करुन जमीन भुसभुशीत करावी. हेक्टरी २५ टन सेंद्रिय खत टाकून घ्याव.
  • सरी आणि वरंबा ‍किवा सपाट जमिनीवर लागवड करावी. चांगल्या वाढीसाठी व अधिक उत्पादनाकरिता निंबोळी पेड ‍किवा कोंबडी खताचा वापर करावा.
  • खरीप हंगामात दोन ओळीतील अंतर ७५-६० सेंमी ठेवावे. आणि उन्हाळयात ४५ सेंमी ठेवावे. दोन झाडांतील अंतर ३०-४५ सेंमी राहील, अशा हिशोबाने बी टोकावे. जमिनीचा पोत बघून अंतर कमी जास्त करावे.
  • प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केल्यास भेंडी पिकाची वाढ व उत्पादनामध्ये वाढ होते.    जमिनीमध्ये ओलावा ‍ टिकवून राहतो.
  • आच्छादनामुळे अधिक प्रमाणात फुलांची संख्या, उत्कृष्ट प्रकारे फळधारणा, जास्तीचे फुटवे आणि फळांचे वजन वाढून उत्पादनामध्ये वाढ होते.

सुधारित जाती ?

भेंडीचे दर्जेदार व विक्रमी उत्पन्न हे सुधारित वाणावर अवलंबून असते. त्यामुळे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी योग्य वाणांची निवड करावी. भेंडीच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या जातीचा विचार केल्यास परभणी क्रांती, अर्का अनामिका, फुले कीर्ती, फुले उत्कर्षा, पुसा सावनी, कामिनी, पुसा मखमाली या वाणाची निवड करावी.

बियाणे प्रमाण किती असावे ?

उन्हाळी भेंडी लागवडीसाठी हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. लागवडीचे अंतर, बियाणे उगवण क्षमता आणि हंगामानुसार बियाणे प्रमाण कमी जास्त होऊ शकते.

खत व्यवस्थापन कसे करावे ? 

लागवडीपूर्व २५-३० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. नत्र, स्फुरद, पालाश १०० : ५० : ५० किलो प्रति हेक्टरी द्यावा. नत्र वाढीच्या अवस्थेनुसार विभागून द्यावा. फवारणी व ठिबक सिंचनाच्या माध्यामातून विद्राव्य खतांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते.

पाणी व्यवस्थापन किती द्यावे ?

भेंडी पिकाला उन्हाळी हंगामात पाण्याची पातळी मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देणे गरजेचे असते. ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो. सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत २.४ लिटर पाणी प्रति ४ झाड या प्रमाणे प्रत्येक दिवस गरजेचे असते. त्यानंतर ७.६ लिटर पाणी प्रति ४ झाड या प्रमाणे गरज असते. एक दिवस आड ‍ ठिबकद्वारे पाणी द्यावे.

आंतरमशागत कशी करावी ?

गरजेनुसार खुरपणी, कोळपणी करुन तणांचा बंदोबस्त करावा. सरी वरंबा पध्दत मध्ये   पिकाला मातीची भर देऊन घ्यावी.

भेंडी पिकांवरील रोग व किडी ?

रोग :-  भुरी, केवडा, पानांवरील ठिपके, यलो व्हेन मोझॅक, मर रोग इ.

कीडी : फळे पोखरणारी अळी, खोडकीड, मावा, तुडतुडे, लाल कोळी इ.

भेंडीचे एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन कसे करावे

  • जमिनीची खोलवर नांगरणी करावी.
  • पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे व्यवस्थापनाकरीता निळे तसेच पिवळया रंगाचे 10 सापळे प्रती हेक्टरी या प्रमाणात शेतामध्ये लावावे.
  • रोग-कीडग्रस्त झाडे शेतातून उपटून नष्ट करावीत.
  • किडींच्या व्यवस्थापन करीता पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  • प्रत्येक 10 ओळीनंतर एक ओळ झेंडू फुलांची लावावी.
  • किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर शिफारशीत मात्रेतच करावा.

तोडणी कशी करावी  ?

भेंडी लागवडीपासून फूल लागायला 35-40‍ दिवसांनी सुरुवात होते. त्यानंतर 55-56 दिवसांनी सुरुवात होते. त्यानंतर 55-65 दिवसांनी तोडणी होत. साधारण 2-3 इंच लांब भेंडीची तोडणी करावी. एकदिवसाआड काळजीपुर्वक तोडणी करावी. तोडणीनंतर भेंडी सावलीत ठेवावी. फळांची आकारानुसार वर्गवारी करुन, त्यामधील रोगट व कुरुप फळे काढून टाकावी.

उत्पादन किती मिळते ?

भेंडी पिकाची योग्य पद्धतीने लागवड केल्यास त्यापासून प्रती हेक्टरी 12-15 टन उत्पादन मिळते. परंतु भेंडीचे उत्पन्न हे वाण, हंगाम, लागवड पद्धत व तोडणी व्यवस्थापन या बाबींवर अवलंबून असते.

Subscribe Now

Please check your email & confirmation completed

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *