Saturday, January 25, 2025

Top 5 This Week

Related Posts

ऊस लागवडीचे शाश्वत तंत्रज्ञान

ऊस हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे. ऊस पिकामुळे महाराष्ट्रातील सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळाली आहे. तसेच ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या असून त्यांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यास मोठी मदत झालेली आहे.

देशात अंदाजे 5 कोटीपेक्षा जास्‍त शेतकऱ्यांना आधार देणारा हा ऊस कारखानदारी उद्योग जगात द्वितीय क्रमांकावर आहे. ब्राझील अद्यापही प्रथम क्रमांकावर भक्‍कमपणे उभा आहे. जागतिक उत्‍पादनात भारताचा अंदाजे 17 टक्‍के वाटा आहे. परंतु साखर निर्यातीत त्‍याचा केवळ 4 टक्‍के इतका वाटा आहे. सध्‍या अंदाजे 80 हजार कोटीच्‍या आसपास मूल्‍य निर्माण करणारा हा उद्योग नियंत्रणाच्‍या श्रृंखलांमधून मुक्‍त होण्‍याची वाट पाहत आहे.

अलीकडच्या काळात ऊसाची प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविण्यास आपण अपयशी ठरलो आहोत, कारण कृषि विद्यापीठाने व संशोधन संस्थेने विकसित केलेल्या सुधारित व संकरित जातींचा शेतकरी लागवडीसाठी वापर न करणे, पाणी देण्याच्या पारंपरिक पद्धतीचा वाढता वापर करणे, रासायनिक खतांचा बेसुमार वापर करणे, केंद्र शासनाचा ऊस पिकाला मिळणारा तुटपुंजी भाव व ऊस तोड मजुरांची दिवसेंदिवस घटती संख्या इ. प्रमुख समस्या एकविसाव्या शतकात शेतकरी व ऊस उत्पादक कारखानदारी व्यवसायासमोर मोठी आव्हाने निर्माण झालेली आहेत. अशा परिस्थितीत ऊस शेती व्यवसाय दिवसेंदिवस तोट्यात चाललेला असल्याचे दिसून येते.

ऊसाचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी ऊस लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांना करावयास हवा. सुधारित लागवड तंत्र, ऊसाचे रोपे, ऊस बेणे प्रक्रिया, लागवडीसाठी आधुनिक यंत्राचा वापर, कृषि विद्यापीठ व ऊस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या ऊसाच्या नवीन वाण, ऊसाचे लागवड अंतर, ऊस लागवडीच्या पद्धती, ऊसातील आंतरमशागत, पाणी व्यवस्थान, खत व सूक्ष्म अन्नद्रव्याचे व्यवस्थापन, ऊसातील तणांचा बंदोबस्त, पाण्याद्वारे विद्राव्ये खते देणे, उसासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर, ऊस तोडणी व वाहतूक इत्यादी अनेक बाबींचा योग्य समतोल साधल्यास ऊसाचे प्रतिहेक्टरी उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे ऊस शेतीतील उत्पादनास शाश्वत आणता येईल. त्यामुळे सदरील लेखाद्वारे ऊस लागवडीचे शाश्वत तंत्रज्ञान या ‍विषयावर सखोल माहिती सादर करण्यात येत आहे. या तंत्राचा शेतकऱ्यांनी  त्यांच्या शेतात अवलंब केल्यास किफायतशीर ऊसाचे उत्पादन निश्चितपणे मिळू शकेल, यात शंका नाही.   

ऊस लागवडीचे शाश्वत तंत्रज्ञान

ऊस उत्पादन :

महाराष्‍ट्र राज्‍यात सन 2017-18 मध्‍ये ऊस क्षेत्र सरासरी 9 लाख 2 हजार 35 हेक्‍टर एवढे असून 722 लाख मेट्रिक टन ऊस  गाळपासाठी  उपलब्ध होणार आहे. उर्वरित ऊस बेणे, रसवंती व ऊस गुऱ्हाळ यासाठी जाऊन प्रत्‍यक्षात गाळपासाठी 649 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्‍ध होईल असा अंदाज साखर आयुक्‍तालय, पुणे यांनी दिलेला आहे. राज्‍यात सर्वाधिक 2 लाख 94 हजार 289 हेक्‍टर क्षेत्रावर पुणे विभागात लागवड करण्‍यात आली, तर सर्वात कमी नागपूर विभागात 11 हजार 165 हेक्‍टर क्षेत्रावर उत्‍पादन झाले.

महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या तुलनेत एकूण सरासरी ऊसाखालील क्षेत्र 9 लाख 42 हजार 560 हेक्‍टर असून, पुणे विभागातील पुणे, सोलापूर व सातारा जिल्‍ह्यातून मिळून 2 लाख 94 हजार 289 हेक्‍टर तर ऊस नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्‍ह्यांमध्‍ये मिळून 11 हजार 165 हेक्‍टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झालेली होती.

महाराष्‍ट्रातील ऊस कमी उत्‍पादकतेची कारणे

1)     ऊसाची पारंपारिक पद्धतीने लागवड करणे.

2)   लागवडीपूर्वी बिण्‍यास बेणे प्रक्रिया वा उष्‍णजल प्रक्रिया न करणे.

3)   ऊसाच्‍या सुधारीत व संकरित जातीचा लागवडीसाठी अभाव.

4)     खोडवा पिकाचे एकात्मिक व्‍यवस्‍थापन न करणे.

5)     ऊस उत्पादनात आधुनिक सिंचन पद्धतीचा अभाव.

6)     कीड व रोगांचे एकात्मिक नियंत्रणाचा अभाव.

हवामान :

ऊस पीक वाढीच्‍या काळात उष्‍ण तापमानाचा कालावधी व सूर्यप्रकाशाचा कालावधी अधिक असल्‍यास आणि पाण्‍याची कमतरता न भासल्‍यास ऊसाची वाढ उत्तम होते म्‍हणजेच कांड्याची संख्‍या व लांबी वाढते. पानांची संख्‍या अधिक असते आणि ऊसाचे जास्‍तीत जास्‍त उत्‍पादन आणि उत्‍पादकता मिळते. ऊस वाढीच्या काळात 1100 ते 1500 मी. मी. पावसाची गरज असते. पीक परिपक्‍व होण्‍यासाठी कोरडे हवामान, प्रखर सूर्यप्रकाश असावा, मात्र थंड हवामान आणि धुके नसलेले हवामान अत्‍यंत गरजेचे असते. जेव्‍हा पीक परिपक्‍वतेचे दिशेने वाटचाल करते, तेव्‍हा सुरूवातीस 83 टक्‍के इतके पाण्‍याचे प्रमाण म्‍हणजेच रसाचे प्रमाण असते, मात्र ऊस परिपक्‍व होताच पाण्‍याचे किंवा रसाचे प्रमाण घटते ते 71 टक्‍के इतके होते. त्‍याच कालावधीत साखरेचे प्रमाण ऊसात 10 ते 45 टक्‍क्‍यापर्यंत वाढत जाते आणि ते प्रमाण ऊस वाळल्‍यानंतर भागाच्‍या प्रमाणानुसार असते. वादळी, वारे, गारपीट, सोसाट्याचा वारा यामुळे ऊसाचे पीक लोळ शकते. चक्रीय वारे आणि वादळेही या पिकाच्‍या वाढीवर विपरित परिणाम करतात.

जमीन :

ऊस पिकासाठी जमीन कमीत-कमी 50 ते  75 सें.मी. खोलीची, भुसभुशीत, सच्छिद्रता असलेली, निचरा होणारी क्षारांचे प्रमाण नसलेली जमीन उत्तम असते. ऊस पिकासाठी जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असेल तर उत्पादन चांगले मिळते. जमिनीच्‍या प्रकारानुसार मशागत, भरखते, वरखते, पाणी देण्‍याच्‍या पद्धती, लागवड पद्धत यामध्‍ये बदल केल्‍यास अपेक्षित उत्पादन घेणे शक्‍य होते. जमीन मुख्यता चार घटकांनी बनली आहे.

माती परीक्षण :  

ऊस पिकाची लागवड करण्‍यापूर्वी पिकाची वाढ चांगली व्‍हावी व जमिनीमध्‍ये कोणती अन्‍नद्रव्‍ये कमी प्रमाणात आहेत व कोणती अन्‍नद्रव्‍य जास्‍त प्रमाणात आहेत, याची माहिती करून घेण्‍यासाठी पूर्व मशागत करण्‍याअगोदर माती परीक्षण करून घ्‍यावे. माती परीक्षण म्‍हणजे जमिनीतील उपलब्‍ध अन्‍नद्रव्‍याचे पृथ्‍थकरण करणे होय. पिकांच्‍या माध्‍यमाची माहिती असणे, पीक व्‍यवस्‍थापनेतील अति महत्‍त्‍वाची बाब आहे. यात मृदाचाचणी आणि पाण्‍याचे पृथ्‍थकरण आहेत. मृदा चाचणीमुळे जमिनीचा आम्‍ल-विम्‍ल निर्देशांक, चुन्‍याचे प्रमाण, विद्युतवाहकता, सेंद्रिय कर्ब, उपलब्‍ध नत्र, स्‍फुरद तसेच गंधक, चुना, लोह, जस्‍त, बोरॉन व तांबे ही अन्‍नद्रव्‍ये प्रमाणित पद्धतीने काढली जातात. मृदा परीक्षण ही जमिनीचे रासायनिक विश्‍लेषण करण्‍याची जलद पद्धत आहे. यात जमिनीची पिकांना अन्‍नद्रव्‍ये उपलब्‍ध करण्याची क्षमता सुपीकता आाणि उत्‍पादक क्षमतेचा अंदाज लक्षात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करण्यापूर्वी संबंधित माती परीक्षण केंद्राकडे मातीचा नमुना घेऊन तपासणी करावी. 

पूर्व मशागत :

ऊसाचे पीक शेतात साधारणपणे 3 वर्षापेक्षा ज्यादा कालावधीसाठी उभे असते. ऊसाच्या मुळया जमिनीमध्ये चारही बाजूंनी विस्तारत असतात. यासाठी जमिनीची खोलवर नांगरणी करणे अत्यंत आवश्यक आहे. बागायती जमिनीमध्ये पाणी, मशागत, खते इ. मुळे 6 ते 8 इंच खोलीवर घट थर तयार होतो. तो घट थर तोडून चांगल्या प्रकारे पूर्व मशागत करणे गरजेचे आहे. ऊसाच्या मुळया 90 ते 100 सें.मी. पर्यत खोल जाऊ शकतात. त्यामुळे जमिनीत योग्य ओलावा असताना खोल नागरट करावी जमीन तापू दयावी त्यानंतर हे 50 गाड्या शेणखत / कंपोस्ट खत जमिनीवर एकसारखे पसरवून कुळव/फनीच्या साह्याने ढेकळे फोडावी. त्याचप्रमाणे चांगल्या पाणी नियोजनासाठी जमीन समपातळीत आणावी. शेणखत/कंपोस्ट खताची कमतरता भासल्यास हिरवळीच्या खताचा वापर करावा.

ऊस : हंगामनिहाय सुधारित जाती :

अ) पूर्व हंगामी (ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबर)- को-7219, कोम-7714, को-740, को-86932, कोसी-671 व को-8014 या जातींचा लागवडीसाठी वापर करावा. महाराष्‍ट्रात ह्या जातींचा मोठ्या प्रमाणावर लागवडीसाठी वापर केला जातो.

ब) सुरू हंगामी (जानेवारी-फेब्रुवारी)- को-419, को-7219, कोम-88121,को-740, कोम-7125, कोसी-671, को-8014, को-86032 इ. सुधारित जातींचा सुरू हंगामासाठी वापर करावा. ह्या जाती  रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देतात.

क) आडसाली ऊस (जूलै-ऑगस्‍ट)- आडसाली ऊस लागवडीत ऊस शेतात साधारणपणे 16 ते 18 महिने शेतात उभा राहत असल्‍यामुळे या पिकासाठी को-740, को-88121 व को-86032 इ. जातींचा आडसाली ऊस लागवडीसाठी वापर करावा. कारण जूलै महिन्‍यात आपल्‍याकडे पावसाळा सुरू असतो त्‍यामुळे ऊसाची चांगल्‍या प्रकारे वाढ होऊ शकते.

ऊस बेणे निवड ठळक वैशिष्टये

  • ऊसाचे बेणे जाड, रसरशीत व सशक्त असावे.
  •  डोळ्यांची वाढ चांगली (पूर्ण) झालेली असावी व डोळे फुगीर असावेत.
  •  डोळे जास्त जुनी व निस्तेज नसावेत.
  • 10 ते 11 महिने वयाचा ऊस बेण्यासाठी वापरावा.
  • बेणे रोग व किडमुक्त असावे.
  •  मुळ्या फुटलेला, पांगशा फुटलेला तुरा आलेला ऊस बेण्यासाठी वापरू नये.
  •  खोडवा ऊस बेण्यासाठी वापरू नये.

ऊस बेणे प्रक्रिया :

ऊस लागवडीपूर्वी ऊस हे बेणे मळ्यात वाढविलेले 9 ते 11 महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि अनुवंशिकदृष्‍ट्या शुद्ध बेणे वापरल्‍यास ऊस उत्‍पादनात 15 ते 20 टक्‍के वाढ होते. जिवाणू खतांच्‍या प्रक्रियेमुळे 50 टक्‍के नत्र, 25 स्‍फुरद खतांची बचत होते व उत्‍पादनात वाढ होते. त्‍यानंतर 100 लिटर पाण्‍यात 100 ग्रॅम कार्बेन्‍डेझिम आणि डायमेथोएट 10 मिनिटे बुडवूना काढाव्‍यात. त्‍यानंतर त्‍याची लागवड करण्‍यात यावी. यामुळे बुरशीजन्‍य, जिवाणूजन्‍य व मररोगापासून संरक्षण होते व उत्‍पादनात चांगली वाढ होते.

ऊस रोपे तयार करणे :

रोपे निर्मितीसाठी सरीत पट्टया पसरण्‍यासाठी 50 पोती लागतात. एक एकर लागवडीसाठी दोन गुंठे क्षेत्र आवश्‍यक असते. प्रत्‍येकी 100 फूट लांब खताच्‍या पोत्‍याच्‍या पट्टयात अंथरल्‍या. एका पोत्‍यापासून 15 फूट अंतराची पट्टी तयार होते. पट्टीच्‍या कडा सरीच्‍या बगलेतील मातीने बुजविल्‍या. पट्टीवर दोन बोटे जाडीचा मातीचा थर घातला. त्‍यात पुरेसे शेणखत, क्‍लोरऍन्‍ट्रानिलीप्रोल (दाणेदार) व डीएपी मिसळून एक डोळ्याची कांडी लागवड केली. फुले265 या जातीचे दहा महिने वयाचे प्रमाणित बेणे निवडले. बेणे प्रक्रियेनंतर सरीत अंथरलेल्‍या पट्टीवरील शेणखत-मातीच्‍या मिश्रणाच्‍या बेडवर कांडीवरील डोळ्याची बाजूवर करून कांड्या आडव्‍या ठेवावेत. बेणे लावल्‍यानंतर पट्टीच्‍या कडेने मातीत लहानशी चळी घेऊन ती माती बेण्‍यावर अंथरून हलकासा दाब दिला. चळीमुळे पट्टीवर जादा झालेले पाणी निघून जाते.

ऊसाची बेणे लागवड पूर्ण झाल्‍यावर गरजेनुसार पाणी चार दिवसांनी तणनाशकाचा वापर बेण्‍याची उगवण 15 दिवसांत पूर्ण (पारंपारिक पद्धतीमध्‍ये 15 ते 25 दिवस लागतात) रोपवाटिकेत बेणे लागवडीनंतर 20 व्‍या दिवशी युरिया सरीत विस्‍कटून द्यावा. सुमारे 21 व्‍या दिवशी 19:19:19 नत्र, स्‍फुरद व पालाश या विद्राव्‍य खताची फवारणी केली. क्‍लोरोपायरीफॉस व त्‍यानंतर सूक्ष्‍म अन्‍नद्रव्‍य फवारणी. सुमारे 30 दिवसांत चार पानांची रोपे तयार झाली. पुनर्लागवडीच्‍या दिवशी कात्रीने रोपांची वरची निम्‍मी पाने कापली, यामुळे लागवडीनंतर रोपांचे बाष्‍पीभवन कमी होण्‍यास मदत होते.

तीन स्तरीय बेणे मळा पद्धती :

1)प्रजनीत (ब्रीडर) बेणे

या प्रकारचे ऊस बेणे फक्त संशोधन संस्थांच्या (व्ही.एस. आय., पुणे ऊस संशोधन केंद्र पाडेगांव, विभागीय ऊस व गुळ सेंशोधन केंद्र कोल्हापूर व कृषि विद्यापीठे इ.) प्रक्षेत्रावर तयार करून त्याचे कारखाने किंवा संशोधन संस्थांच्या प्रक्षेत्रावर पायाभूत बेणे तयार करण्यासाठी दिले जाते. या प्रकारच्या बेणे निर्मितीसाठी मूलभूत बेणे वापरून त्यावर खालीलपैकी एक प्रक्रिया केली जाते.

अ) उष्णजल प्रक्रिया : बेणे 50 अंश सें. तापमान दोन तास किंवा 52 अंश सें. तापमान अर्धा तास याप्रमाणे प्रक्रिया करून लागण करावी.

ब) बाष्प उष्ण हवा प्रक्रिया : 54 अंश सें. तापमान 2.5 तास प्रक्रिया करून लागण करावी. या बेणे प्रक्रियामुळे प्रामुख्याने काणी व गवताळ वाढ या रोगांचा नाश होतो.

2)पायाभूत (फाऊंडेशन) बेणे

पायाभूत बेणे संशोधन संस्था किंवा करखाना प्रक्षेवार तयार केले जाते. या बेण्यावर मूळ व कांडी कूज यासारखे रोग आणि खवले कीड, पिठे कीड इ. नाश करण्यासाठी लागणीच्या वेळी औषधांची बेणे प्रक्रिया करावी.

3)प्रमाणित (सर्टिफाईड) बेणे

पायाभूत बेणे कारखाने किंवा निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर प्रमाणित बेणे तयार करण्यासाठी दिले जाते. सदरील बेणे मळा कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करावा व वेळोवेळी तज्ज्ञांकडून तपासून घ्यावा. रोग, कीड व ऊसाच्या इतर जातींचे ऊस आढळल्यास वेळोवेळी ताबडतोब काढून त्याची नोंद घ्यावी. असे प्रमाणित बेणे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतामध्ये लावण्यासाठी दिले जाते.

ऊस लागवड हंगाम :

ऊस पिकाची लागवड महाराष्ट्रात वर्षभरात तीनही हंगामात करता येते. त्‍यात प्रमुख्‍याने आडसाली हंगाम, पूर्व हंगाम व सुरू हंगामात केल्‍यास समानधानकारक उत्‍पन्‍न मिळते. ऊस लागवडीचे प्रामुख्याने तीन प्रमुख हंगाम आहेत.

) आडसाली हंगाम : आडसाली ऊसाची लागवड जुलै -ऑगस्ट महिन्यात केली जाते. हा ऊस 16 ते 18 महिने शेतात राहतो. 

) पूर्व हंगाम: पूर्व हंगामी ऊसाची लागण सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यात केली जाते. पूर्व हंगाम या पद्धतीचा उपयोग महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केला जातो. या पद्धतीत ऊस 14 ते 15 महिने शेतात राहतो व ऊस लवकर परिपक्व होतो त्यामुळे ऊसाची तोड सुद्धा लवकर होते.

) सुरू हंगाम : सुरू हंगामी ऊसाची लागण डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात केली जाते. या पद्धत फारच प्रचलित नसून महाराष्ट्रात काही जिल्ह्यात या पद्धतीने ऊस पिकासाठी हंगाम निवडतात. या पद्धतीत ऊस 13 ते 14 महिने शेतात राहतो. कारखान्यास जाण्यास काही प्रमाणात विलंब लागतो.

तक्‍ता क्र. 1 : ऊस लागवडीचा प्रकार व कालावधी याची माहिती

लागवड प्रकारलागवड कालावधी पीक कालावधी मह‍िने
आडसाली15 जुलै ते 15 ऑगस्ट16 ते 18 महिने
पूर्व हंगाम15 ऑक्टोबर 15 नोव्हेबर14 ते 16 महिने
सुरू हंगाम15 जानेवारी 15 फेब्रुवारी12 त 14 महिने
खोडवाआक्टोबर ते फेब्रुवारी अखेर12 ते 13 महिने

ऊस लागवडीचे प्रकार :

जमिनीचा प्रकार व पाण्याचे साधन, पाणी देण्याची पद्धत ऊस शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा उपयोग इ. बाबी वि