देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्याकरिता मुबलक अन्नधान्याची सोय करणे हा देशाला भेडसवणारा प्रश्न आहे. या प्रश्नावर मात करण्यासाठी शेतीच्या विविध क्षेत्रात संशोधन होणे आवश्यक आहे.
औद्योगीकरणामुळे ग्रामीण भागातील मजूर शहराकडे रोजगाराच्या शोधात स्थलांतरीत होत आहेत. त्यामुळे शेतीमध्ये कामे करण्यास मजुराची टंचाई वारंवार निर्माण होत असून शेतकरी बांधवांना शेतातील कामे करण्यासाठी सतत मजूरांवर अवलंबून राहवे लागते. शेतीचे कामे हे वेळेवर होणे अतिशय महत्वाचे असते. अन्यथा त्याचा पीक उत्पादनावर विपरित परिणाम होऊ शकतो. म्हणूनच शेतीचे यांत्रिकीकरण हाच एक पर्याय नसून ती काळाची गरज झाली आहे.
शेतीतील विविध प्रकारची कामे उदा. नांगरणी, पेरणी, कोळपणी, आंतरमशागत, काढणी व मळणी इत्यादी करण्यासाठी यंत्रे व कृषी अवजारांची गरज असते. सुधारित कृषी यंत्रामुळे कमी वेळेत जास्तीचे कामे करता येऊ शकते, वेळेची व श्रमाची बचत होऊन अधिक कामे जलद गतीने करणे शक्य होते. त्यामुळे शेतातील कामे वेळेवर झाल्यामुळे पीक उत्पादनात वाढ होते. यामुळेच सुधारित कृषी यंत्राचा वापर व उपयोग विविध पीक पद्धतीमध्ये दिवसेंदिवस होत आहे.
पेरणीसाठी सुधारित कृषी यंत्रे हा लेख शेतकरी बांधवांना नवनवीन कृषी अवजारांची माहिती मिळावी, नवीन तंत्रज्ञान समजून घेता यावे, कृषी अवजारांचा वापर करता यावा, वेळ व श्रमाची बचत करून उत्पादन अधिकाधिक प्रमाणात वाढवता यावे, यंत्राच्या वापरामुळे मजुरावर अवलंबून राहावयाची गरज भासणार नाही. अशा बहुउपयोगी उद्देशाने महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ स्तरावर अभियांत्रिक विभागात झालेल्या नवीन व पुनर्विलोकीत संशोधनाचा आधार घेऊन सदर लेख तयार करण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे.
1) सुधारित बहुपीक पेरणी यंत्र
पारंपरिक पेरणी पद्धतीमध्ये शेतकरी एक चाड्याची पाभर प्रामुख्याने वापरत असे. त्यातून बियांची पेरणी होत असली तरी खतांची मात्रा अंदाजाने शेतात फेकून दिली जाई. यातही हाताने बी सोडले जात असल्याने कमी अधिक प्रमाणात होण्याची शक्यता असे. पुढे एका चाड्याच्या पाभरीऐवजी दोन चाड्याच्या जमिनीमध्ये खत पेरून दिले जाई. खत बियांच्या जवळ मातीमध्ये खाली पेरू दिल्यामुळे उत्पादनामध्ये 10 ते 15 टक्के वाढ मिळू लागली. अर्थात दोन चाड्याच्या पेरणीमध्ये खत आणि बी पेरणीसाठी अनुभवी, कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असे. पूर्वी ही पाभर बैलाच्या साह्राने चालवली जाई. बैलचलित पाभरीने अंदाजे 2.5 ते 3 एकर पेरणी शक्य होते.
तसेच पीक उगवल्यानंतर विरळणी किंवा पुनर्लागवड मजुरांच्या साह्राने करावी लागते. अलीकडे मजुरांचा उपलब्धता कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. त्याचप्रमाणे केवळ मशागत आणि पेणीसाठी बैल सांभाळणे जिकीरीचे होत असल्याने बैलाचे प्रमाण गावपातळीवर कमी झाले आहे. ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्राचा वापर वाढला आहे. या यंत्रामुळे आठ तासामध्ये 6 ते 7 एकरपर्यंतची पेरणी शक्य आहे. वरील शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन विद्यापीठामध्ये सुधारित अवजारे व यंत्रे विकसित केली आहेत.
2) ज्योती बहुपीक टोकण यंत्र
ज्योती बहुपीक टोकण यंत्र हे अवजार बैलचलित असून बैलजोडीच्या साह्राने चालते. याला चालवण्यासाठी एका मनुष्याची आवश्यकता असते. या यंत्रावर बियाण्यासांठी तीन पेट्या तीन फणांवर स्वतंत्रपणे बसवलेल्या असतात. प्रत्येक पेटीमध्ये 3 ते 5 किलो बी ठेवता येते. तळाशी बी प्रमाणित करण्याची यंत्रणा आहे. पिकाच्या आवश्यकतेनुसार प्लॅस्टिकच्या तबकडयांचा वापर केला जातो. त्याद्वारे बी मोजून ठराविक अंतराने फणात टाकले जात असल्याने ते शिफारशीत अंतरावर पडते. रोपातील अंतर आपोआप राखले जात असल्याने विरळणीची आवश्यकता राहत नाही. बियांच्या पेट्या बसवलेल्या फणांतील अंतर कमी जास्त करता येते. पिकाच्या दोन ओळीतील अंतर 22.5 सेमी, 30 सेंमी किंवा 45 सेंमीपर्यंत ठेवता येते. प्रत्येक पिकाच्या दाण्याच्या आकारमानानुसार स्वतंत्र तबकडी तयार केलेली आहे. या तबकड्या पेटीच्या तळाशी असलेल्या यंत्रणेमध्ये बसवाव्यात. या यंत्रणेमुळे हेक्टरी रोपांची संख्या शिफारशीनुसार राहते.
या यंत्राच्या सांगाड्यावर एक लोखंडी पेटी असून, त्यात 25 किलोपर्यंत दाणेदार खत ठेवता येते. त्यातही खत प्रमाणित करण्याची यंत्रणा असून, पेटीच्या मागे असलेल्या तरफेच्या साह्राने खताचे हेक्टरी प्रमाण ठरवता येते. हे प्रमाण 25 ते 700 किलो असे शिफारशीनुसार ठेवता येते. खते जमिनीमध्ये पेरणीसाठी तीन स्वतंत्र फण यंत्रावर बसवलेले असतात. त्यातील आंतरपिकाच्या ओळीच्या अंतरानुसार बदलता येतते. खत साधारणपणे बियांच्या ओळीच्या बाजूने 5 सेंमी अंतरावर व बियांच्या 5 सेंमी खोलीवर पेरता येते. खते पेरून झाल्यानंतर ही पेटी स्वच्छ करुन ठेवणे आवश्यक आहे.
मशागतीने भुसभुशीत झालेल्या जमिनीत टोकणयंत्र अधिक खोलीवर घुसू नये, यासाठी यंत्राच्या चाकावर लग्स बसवलेले आहेत. खते आणि बियाणे योग्य खोलीवर टाकण्यासाठीही यंत्रणा आहे. तसेच प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचेपर्यंत ते पडू न देण्यासाठीही क्लच बसवला आहे. यातून आंतरपिकाचीही टोकण करता येते.
ज्योती बहुपीक टोकण यंत्राची वैशिष्ट्ये
- भुईमुग, सोयाबीन, हरभरा, मका, सूर्यफूल, ज्वारी, गहू यांची टोकण करता येते.
- बियाण्यांसोबत दाणेदार खतांची मात्रा देता येते.
- पिकांच्या ओळीतील अंतर 22.5, 30 किंवा 45 सेंमी ठेवता येते.
- दोन रोपातील अंतरही शिफारशीनुसार ठरवता येते. त्यासाठी पीकनिहाय तबकड्या उपलब्ध केल्या आहेत.
- तीन बी पेटयांची साठवणक्षमता 9 किलो असून खत पेटीची साठवणक्षमता 25 किलो आहे.
- यंत्राचे वजन 75 किलो असले तरी दोन चाकावर चालत असल्याने बैलांना ओढण्यासाठी जास्त ताकद लावावी लागत नाही.
- आठा तासात 1.25 ते 1.5 हेक्टर टोकण पद्धतीने पेरणी करता येते.
3) पॉवर टिलरचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र
या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, मका, हरभरा, तूर इ. पिकाची टोकण व दाणेदार खतांची मात्रा पेरता येते. दोन ओळीतील अंतर 22.5, 30 किंवा 45 सेंमी ठेवता येते. हे यंत्र 12 एचपी पॉवरटिलरने चालविता येते. या यंत्राची कार्यक्षमता 0.75 ते 1 हेक्टर इतकी आहे. कमी वेळेत जास्त क्षेत्रावर पेरणी करता येते.
4) ट्रॅक्टरचलित फुले सरी वरंबा यंत्र
या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, मका, गहू, हरभरा, तूर इ. पिकाची सरी वरंबा टोकण पद्धतीने पेरणी करत येते. सरीच्या दोन्ही बाजूला पेरणी होते. सरीच्या अंतरानुसार लागवडीचे अंतर बदलता येते. हे यंत्र 55एचपी ट्रॅक्टरवर चालते. त्याची कार्यक्षमता 0.45 हेक्टर प्रति तास इतकी असून, कोरडवाहू क्षेत्रासाठी विशेष शिफारस करण्यात आली आहे.
5) इन्कलाइंड प्लेट प्लांटर
पारंपरिक पद्धतीच्या पेरणीमुळे रोपांच्या विरळणीचा खर्च वाढतो. पेरणीनंतरच्या मशागतीमध्येदेखील बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे पिकाचे उत्पादन कमी येते. हे लक्षात घेऊन भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्थेतील तज्ज्ञांनी कोदो, कुटकी, सावा, चिमा, कंगणी आणि रागी या पिकांच्या अचूक पेरणीसाठी पॉवर टिलरचलित इन्कलाइंड प्लेट प्लांटर या यंत्राची निर्मिती केली आहे.
कोदो, कुटकी, सावा, चिमा, कंगणी आणि रागी या पिकांची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यात केली जाते. या पिकांतील पोषक घटक लक्षात घेता सध्याच्या काळात कुपोषण आणि मधुमेह रोगींच्या आहारात या पिकांचा समावेश महत्त्वाचा आहे.
सध्याच्या काळात कोदो, सावा, रागी या पिकांची लागवड पारंपरिक पद्धतीने केली जाते. त्यामुळे बियाणे एक समान अंतर आणि खोलीवर पेरले जात नाहीत, तसेच एकरी बियाणे जास्त लागते. पारंपरिक पद्धतीच्या पेरणीमुळे रोपांच्या विरळणीचा खर्च वाढतो. पेरणीनंतरच्या मशागतीमध्ये देखील बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे पिकाचे उत्पादन कमी येते. हे लक्षात घेऊन भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्थेतील तज्ज्ञांनी कोदो, कुटकी, सावा, चिमा, कंगणी आणि रागी या पिकांच्या अचूक पेरणीसाठी पॉवर टिलरचलित इन्कलाइंड प्लेट प्लांटर या यंत्राची निर्मिती केली आहे.
पावर टिलरचलित इन्कलाइंड प्लेट प्लांटर
- एका वेळी सहा ओळींमध्ये बियाण्यांची अचूक पेरणी.
- यंत्राचे घटक मुख्य सांगाड्याला जोडलेले असतात.
- यंत्रामध्ये 24 खाचा असणारी इन्कलाइंड मीटरिंग प्लेट (6 नग), बियाणे पेटी (6 नग), बियाणे नलिका (6 नग),
- फण (6 नग), चेन-स्प्रॉकेट मीटरिंग (2 नग), चाके (2 नग) हे मुख्य भाग आहेत.
यंत्राची कार्यप्रणाली
- यंत्राच्या सर्व मीटरिंग प्लेट एकाच ड्राइव्ह शाफ्टवरती लावलेल्या असतात. हा शाफ्ट यंत्राच्या दोन्ही बाजूला असलेल्या चाकांद्वारे चेन-स्प्रॉकेट मीटरिंगच्या साहाय्याने फिरवला जातो.
- चेन-स्प्रॉकेट आणि ड्राइव्ह शाफ्टमधील गेअर रेशो (1:2) असतो.
- यंत्र चालत असताना या प्रणालीमुळे मीटरिंग प्लेट फिरते. पेटीमधून बियाणे उचलून नलिकामध्ये टाकले जातात.
- नलिकामधील बियाणे फणाने उकरलेल्या मातीच्या सरीमध्ये पेरले जातात.
यंत्राचे फायदे
- बियाणे 7.5 ते 10 सें. मी. अंतर आणि 1.5 ते 2 सें. मी. खोलीवर पेरले जाते.
- यंत्राद्वारे पेरणी केली असता पारंपरिक पद्धतीच्या 80 ते 90 टक्के तर ड्रिलिंग पद्धतीच्या 60 ते 70 टक्के बियाण्यांची बचत होते.
- पॉवर टिलरद्वारे हे यंत्र 2 ते 3 किमी वेगाने चालवले असता 80 टक्के बियाणे एकसमान अंतरावर पेरले जाते.
- यंत्राची कार्यक्षमता 0.32 हेक्टर प्रति तास आणि कार्यक्षमता 72 ते 82 टक्के आहे.
- हे यंत्र लहान बियाण्यांच्या पेरणीकरिता अत्यंत उपयुक्त.
6) ट्रॅक्टरचलित न्युमॅटिक प्लॅंन्टर
उच्च गुणवत्तेच्या बियाण्यांचा वापर केल्याने पिकाची चांगली उगवण आणि जोमदार वाढ होऊन उत्पादन सुमारे 15 ते 20 टक्के वाढू शकते. पारंपारिक यंत्राद्वारे पेरणी केली तर एकरी जास्त बियाण्यांची गरज भासते, त्यामुळे खर्च वाढतो, लागवडीनंतर विरळणीचा खर्चदेखील वाढतो, परिणामी उत्पादन खर्चात वाढ होते.
प्रिसिजन प्लॅंटर
काटेकोर पेरणीसाठी आधुनिक पेरणी यंत्राचा वापर वाढला आहे. सीड हॉपरमधून एकावेळी एकच बियाणे उचलणाऱ्या पेरणी यंत्रांना प्रिसिजन प्लॅंन्टर म्हणतात. हॉरिझॉन्टल प्लेट प्लॅंन्टर हा पहिला प्रिसिजन प्लॅंन्टर होता. परंतु यामध्ये बियाणे तुटणे तसेच काही खाचा रिकाम्या राहणे किंवा एकापेक्षा अधिक बियाणे उचलणे अशा उणिवा भासतात. या अडचणींवर मात करण्यासाठी व्हर्टिकल, इनक्लांइंड प्लेट प्लॅंन्टर आणि न्यूमॅटिक प्लॅंटर विकसित करण्यात आला.
न्युमॅटिक प्लॅंटरचे घटक : फ्रेम, एस्पिरेटर ब्लोअर, सीड-हॉपर, मिटरिंग युनिट, छिद्रे असलेली वर्तुळाकार डिस्क मिटरिंग प्लेट, व्हॅक्यूम रिटेनिंग प्लेट, फण, ग्राउंड व्हील, कॉर्डेन शाफ्ट.
7) रुंद वरंबा व सरी टोकण यंत्र
हे यंत्र ट्रॅक्टरचलित असून कोरडवाहू शेतीकरिता अत्यंत उपयुक्त आहे. या यंत्राद्वारे रुंद वरंबा व सरी तयार करणे, बियाण्याची टोकण पद्धती पेरणी व खते देणे ही कामे एकाच वेळी करता येतात. त्यामुळे वेळेत व खर्चात बचत होते. विद्यापीठाच्या कृषि शक्ती व अवजारे विभागामार्फत हे यंत्र तयार करण्यात आले आहे. या यंत्रामध्ये सरी तयार करण्याकरिता दोन रिझर असून त्यांच्यामध्ये तयार होणाऱ्या वरंब्यावर टोकण करण्याकरिता चार दाते जोडलेले आहेत. दात्यामधील अंतर पिकानुसार कमी-जास्त करता येते. एका ओळीतील दोन बियांमधील अंतर एकसमान असावे, याकरिता यामध्ये बियाणे चकतीचा उपयोग केलेला आहे. यामुळे प्रत्येक ओळीमध्ये ठराविक अंतरावर बियाणे टोकले जाते. या यंत्राद्वारे रुंद वरंब्यावर पेरणी होत असल्यामुळे, उपलब्ध पाणी हे सरीमध्ये साठवून जास्तीत जास्त प्रमाणात मातीमध्ये मुरविले जाते व पिकास उपलब्ध होते. त्यामुळे जरी दोन पावसामध्ये जास्त खंड पडला तरी पिकास पाण्याचा ताण बसत नाही. त्याचबरोबर जर अतिवृष्टी झाली तरी जास्तीचे पाणी सरींमधून शेताबाहेर काढणे सुलभ होते. या यंत्राद्वारे सोयाबीन, मूग, तूर, हरभरा इत्यादी पिकांची ओळीमध्ये आवश्यक ते अंतर ठेवून पेरणी करता येते.
अशाप्रकारे पेरणीसाठी उपयुक्त विविध प्रकारच्या यंत्राचा थोडक्यात ऊहापोह या लेखात लेखकांनी केला असून याबद्दल शेतकऱ्यांनी कृषी यंत्राची माहिती जाणून घेऊन, पेरणी यंत्राचे महत्त्व, वैशिष्टये व फायदे याविषयी सविस्तर माहिती घ्यावी. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर व कमी कालावधीत जास्तीत जास्त क्षेत्रावर पेरणीसाठी करण्यासाठी सुधारित कृषी यंत्राचा उपयोग निश्चितपणे होईल आणि त्यांचा वेळ व श्रमाची बचत होऊन भेडसावणाऱ्या मजुरांच्या प्रश्नावर पर्याय काढणे शक्य होईल.
संदर्भ :
- गुडालोड संगीता (2020) : आधुनिक कृषि अवजारे व यंत्राचा अभ्यास, अप्रकाशित कृषि विज्ञान पदवी, य.च.म.मु.वि., नाशिक
- देशमुख व्ही. डी. व इतर (2017) : अखिल भारतीय समन्वयित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
- https://mr.vikaspedia.in/
– शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर
very good information