वेगवेगळया प्रयोगातून काही शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून खोडवा पिकाचे योग्य नियोजन, काळजी घेतल्यास लागणीच्या ऊसा इतकेच किंबहूना त्यापेक्षा जास्त उत्पादन येऊ शकते. सध्य परिस्थितीचा आढावा घेता, उदा. (मजूरी, बियाण्याची उपलब्धता, वीज, पाणी याचा वाढता खर्च) शाश्वत ऊस उत्पादन घेताना ऊसाचे जास्तीत जास्त खोडवे घेणे आर्थिक दृष्टया फायदेशीर ठरते.
ऊसाचा खोडवा घेताना जमिनीची पूर्व मशागत, बेणे, ऊसाची लागण, आंतर मशागत इ. बाबी वरील खर्च टाळता येतो. ऊस खोडवा नियोजनामध्ये कमी त्रासाची, कमी खर्चाची व आर्थिक फायद्याच्या पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत.
भारत व इतर प्रगत ऊस उत्पादक देशाचा विचार करता भारतामध्ये दोन किंवा तीन खोडव्यापेक्षा जास्त खोडवे घेतले जात नाहीत; पण ऑस्ट्रेलियात अंदाजे 5 ते 6, ब्राझील 7 ते 8 आणि क्युबा 12 ते 13 खोडवे उत्पादन घेतले जाते आणि प्रत्येक खोडव्याचे उत्पादन लागणीच्या ऊसाइतके असते. आपल्याकडे मात्र खोडवा पिकाकडे दुर्लक्ष केल्यामुळे खोडव्याचे उत्पादन कमी येते.
ऊसाचा खोडवा ठेऊन उत्पादन खर्चात बचत करता येते. लागणीच्या ऊसापेक्षा 35 ते 40 टक्के खर्च खोडवा उत्पादनामध्ये कमी येतो. खोडव्याचे शाश्वत उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करून खोडवा ऊसाचे दर्जेदार उत्पादन घेणे अत्यंत गरजेचे आहे. याच उद्देशाने खोडवा ऊसाचे उत्पादन घटत असल्यामुळे, शेतकऱ्यांना खोडवा ऊसाचे फारशे नियोजन शक्य होत नसल्यामुळे, खोडवा ऊसाचे नियोजन अधिक प्रभावीपणे करून उत्पादन वाढावे यासाठी सदर ऊस खोडवा व्यवस्थापन तंत्र हा लेख तयार करण्यात येत आहे. या लेखाचा उद्देश फक्त एवढा आहे की, महाराष्ट्रातील बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खोडवा ऊस तंत्राचा अवलंब करून ऊसाचे अधिक दर्जेदार उत्पादन घेता यावे असा आहे.
ऊस खोडवा कमी उत्पादन येण्याची कारणे
- ऊसाच्या खोडवा पिकाकडे फारच दुर्लक्ष केले जात असल्यामुळे खोडव्याचे उत्पादन कमी येते.
- लागवडीच्या ऊसाची उगवण विरळ असेल अथवा नांग्या भरलेल्या नसतील तर तो खोडवा विरळ होतो, त्यामुळे हेक्टरी ऊसाची संख्या कमी होऊन उत्पादन कमी येते.
- लागण ऊस पिकास मोठी बांधणी चांगली झाली नसल्यास खोडव्यात फुटव्याची संख्या कमी मिळते.
- सुधारित खोडवा व्यवस्थापन आणि नियोजनाचा अवलंब केला जात नाही.
- लावणीच्या ऊसाची तोंड जमिनीलगत न केल्यास खोडवा पिकात फुटव्याची वाढ योग्य होत नाही. त्यामुळे उत्पादन घटते.
- खोडव्याला सेंद्रिय खताचा पुरवठा केला जात नाही. त्याचा जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होऊन उत्पादन घटते.
ऊस खोडवा व्यवस्थापन महत्वपूर्ण बाबी
- ऊस तोडतांना जमिनीतून असा तोडा की तोडलेल्या ऊसास मुळया असतील किंवा ऊस तोडल्यावर 4 गडी लावून कोयत्याने खोडव्याचा जमिनीवरील भाग तोडून काढा, अगर 8-10 गडी लावून धारदार टिकावाने किंवा कुदळीने 2 इंच जमिनीतून तोडा. नवीन कोंब जमिनीतून उगवावेत.
- ऊस बुडके तोडण्यापूर्वी 5 किलो कळीचा चूना 200 लिटर पाण्यात विरघळून तो खोडक्याच्या बुंध्यावर शिंपडा किंवा बुंधे न्हाऊ घाला.
- पाला सरीत 3 चतुर्थांश व भोंडव्यावर 1 चतुर्थांस पसरा. एक आड एक सरीत पसरू नका. कोणत्याही परिस्थितीत पाला पेटवू देऊ नका अथवा बाहेर काढू नका.
- पाल्याची कुटी करू नका अगर पाला कुजविणारे जिवाणू वापरू नका. तसे करणे चूक आहे त्याने खर्च वाढेल व फायद्याऐवजी तोटाच होईल.
- पाला पसरून झाल्यावर प्रवाही सिंचन करा व दुसरे दिवसापासून आठ-दहा दिवस त्यात जनावरे हिंडवा. जनावरांच्या पायाने पाला रूतून त्याचे 10-15 दिवसांत तुकडे होतील. जनावरे नसल्यास लोखंडी धावाची बैलगाडी सरीला समांतर फिरवा.
- हिरवळीचे खत तयार करण्यासाठी पसरलेल्या पाल्यावर जनावरे फिरविण्याचे थांबविण्यापूर्वी 2 दिवस अगोदर 20 किलो ताग बी किंवा 15 किलो धैंचा बी सर्वत्र फेका ते उपलब्ध नसेल तर 1 किलो राजगीरा 1.5 किलो यांचे बी फेका. दोन महिन्यात उत्तम हिरवळीचे खत तयार होईल व ते उपटू नये तर कापावे.
- ऊस नियंत्रण करणे- हिरवळीचे खताने ऊसाची संख्या मर्यादित राहील. दाट फुटवे येणारे नाहीत एकरी 45-50 हजार ऊस उत्तम वाढतील.
खोडवा ऊसाचे उत्पादन वाढीसाठी उपाय
- ऊसाचे दर्जेदार उत्पादन घ्यावयाचे असेल तर खोडव्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही यासाठी खोडवा व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करावा.
- ऊस तोडणी शक्यतो जमिनीलगतच करावी. कारण ऊस जमिनीलगत तोडल्यामुळे ऊसाची फुटवे फुटण्याची क्षमता वाढते.
- अडसाली किंवा सुरु हंगामी ऊस तुटल्यानंतर साधारणत: 25 ते 30 दिवसांनी ऊस क्षेत्राची पाचट कुट्टी करून घ्यावी. कारण पाचट कुट्टीमुळे अवशेष जमिनीत कुजून जमिनीचा पोत सुधारतो. ऊसाची पाचट शक्यतो जाळू नये.
- खोडवा ऊसामधील आंतरमशागतीचे कामे सुधारित यंत्राद्वारे करावेत.
- खोडवा ऊसासाठी रासायनिक व सेंद्रिय खतांचा किफायतशीर वापर करावा. जेणेकरून खोडवा ऊसाला नवीन पालवी फुटण्यास मदत होईल.
- खोडवा उसाला शक्यतो ठिबक सिंचन पद्धतीनेच पाणी व्यवस्थापन करावे. ज्यामुळे पाण्याची बचत होऊन उत्पादनात भरघोस वाढ होईल.
- खोडवा उसाला रासायनिक खते किंवा विद्राव्ये ठिबक सिंचन पद्धतीनेच देण्यात यावेत.
खोडवा ऊसाचे फायदे
- पूर्व मशागतीची आवश्यकता नसल्याने खर्चात, वेळेत व श्रमात बचत होते.
- लागवडीसाठी बेणे प्रक्रिया व लागवड खर्च यामध्ये बचत होते.
- पहिल्या पिकाची मुळे, डोळे तयार असल्यामुळे खोडवा ऊसाचे फुटवे झपाटयाने वाढतात.
- ऊसाची सर्व फुटवे एकाच वेळी फुटतात व पक्व ऊसाची संख्या चांगली मिळते.
- उगवणीसाठीचा कालावधी लागत नसल्याने खोडव्याला 1 ते 2 महीने लागणीच्या ऊसापेक्षा लवकर पक्वता येते.
- खोडव्यात पाचटाचे अच्छादन करता येत असल्यामुळे तण काढणे व आंतर मशागतीच्या खर्चात बचत होते.
- लागणीच्या ऊसापेक्षा खोडवा पीक पाण्याचा ताण जास्त सहन करत असल्यामुळे पाण्याच्या खर्चात बचत होते.
- लागणीच्या ऊसापेक्षा खोडवा पिकाला 35 ते 40 टक्के खर्च कमी लागतो.
अशाप्रकारे खोडवा ऊस व्यवस्थापन तंत्र या लेखामध्ये खोडवा ऊसाचे महत्त्व, खोडवा ऊस व्यवस्थापन, खोडवा ऊसाचे कमी उत्पादनाचे कारणे, खोडवा उसासाठी आवश्यक बाबी, खोडवा ऊसाचे उत्पादन, खोडवा उसामुळे होणारे फायदे आदी बाबींची माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी केला आहे. त्यामुळे या माहितीचा उपयोग महाराष्ट्रातील तमाम ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना होणार असून त्यांच्या ऊसाचे प्रति हेक्टरी दर्जेदार उत्पादन व उत्पादकतेत निश्चितपणे वाढ होईल.
ऊस खोडवा व्यवस्थापन तंत्र हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करून सहकार्य करावे. धन्यवाद !
Brdt इन्फॉर्मेशन
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.