– डॉ. पांडुरंग मुंढे, (लोकप्रशासन विभाग प्रमुख)
शाश्वत विकास म्हणजे पृथ्वीवरील संसाधनांचा उपयोग करुन आपला विकास करतांना पुढील पिढयांच्या विकासासाठी संसाधनाचा काळजीपूर्वक वापर करणे होय.
शाश्वत विकास या शब्दांत नैसर्गिक आणि मानव निर्मित संसाधनाचा कार्यक्षम आणि योग्य वापर करणे अपेक्षीत आहे. जागतिकीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे नैसर्गिक संसाधने आज मोठया प्रमाणात आणि अनियंत्रितपणे वापरली जात आहेत. आपल्या येणाऱ्या पिढयांचा विचार करुन जी मर्यादित संसाधने आहेत, त्यांचा नियंत्रीत वापर शाश्वत विकासात अपेक्षीत आहे.
विकास हा मानवी समाजाचा स्थायीभाव आहे. आदिम काळापासून मानवी समाज सातत्याने विकास करत आला आहे. त्याच्या प्रवासात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपणास उपलब्ध असलेल्या जमीन, पाणी आणि हवा या तीन नैसर्गिक संसाधनापैकी एक पाणी हे साधन नसेल तर विकास अशक्यच आहे. शेती असो की औद्योगिक विकास असो. पाण्याशिवाय अशक्य आहे. पाण्याविना विकास ही संकल्पनाच अशक्य आहे. पाण्याचे वितरण आणि त्याची गुणवत्ता यात खूप असमानता आहे.
पाणी व मानवी आरोग्य :
संपूर्ण मानवजात एका अनामिक भितीच्या छायेखाली असल्यासारखी वावरत आहे. मुक्त जीवन जवळपास संपुष्टात आले आहे. मानवाच्या तसेच इतर सजीवाच्या शरीराचा 50 टक्के पेक्षा अधिक भाग हा पाण्याने बनलेला असतो व प्रत्येकाला जगण्यासाठी पाण्याचीच आवश्यकता असते ते पाणी विविध कारणांनी दुषित तसेच वापरण्या अयोग्य होत असल्यामुळे आणि पाऊस कमी पडत असल्याने त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. इतकेच नव्हे या पाण्यामुळे नवनवीन गंभीर स्वरुपाचे आजार सजीवांना होत आहेत. आजचे आपले वर्तन अशोभनीय झाले आहे, आपण वैज्ञानिक प्रगतीच्या कितीही गप्पा मारल्या तरी एका बाजूला विकास असला तरी दुसरी बाजू ही नाश आहे. हे विसरता कामा नये. अपूया व अस्वच्छ पाण्यामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. आपण आजारावर औषध शोधून श्रम, वेळ व पैसा खर्च करत आहोत, पण मूलभूत पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न नाहीत त्यामुळे अनेक आजारांचा नवनवीन जन्म होत आहे. त्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर करणे. तसेच निसर्ग नियमानातून पावसाचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करणे, पाणी प्रदूषण टाळून स्वच्छ व भरपूर मिळेल यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तरच शाश्वत विकास होईल.
पाणी व कृषी :
आजची कृषी क्षेत्राची पाण्याची मागणी अशाश्वत आहे. अशास्त्रीय पाण्याच्या वापर
पद्धतीमुळे पाणी पातळी खाली गेली आहे. नदीचे प्रवाह आटले आहेत. वन्यप्राण्यांचे
प्रमाण घटले आहे. तसेच 20 टक्के सिंचनाखालील क्षेत्र खार फुटीमुळे अनुत्पादीत पडीक जमीनीत रुपांतरीत झालेले आहे. अति कृषी कार्यक्रमांचा परिणाम म्हणजे पाणी प्रदूषणात आणखीनच वाढ. अविकसित देशांमध्ये तर पाण्याचा शेतीसाठी मोठया प्रमाणात वापर केला जातो व उत्पन्न मात्र कमी असते. कृषी उत्पादन तर वाढवणे काळाची गरज आहे. त्यामुळे विकसित राष्ट्रांप्रमाणे कडक कायदे करुन योग्य बाबींसाठी सबसिडी देवून कमी पाण्यामध्ये शेतीचे तंत्रज्ञान विकसीत केले पाहिजे व प्रदूषण विरहीत पाण्याचा वापर करुन शाश्वत कृषी विकास साधने शक्य केले पाहिजे. शेती ही पाण्याशिवाय तर अशक्यच आहे. म्हणजेच अन्न निर्मितीवर प्रक्रियाच पाण्यावर अवलंबून आहे. शाश्वत विकासाची त्याशिवाय कल्पनाच करता येणार नाही.
पाणी व ऊर्जा :
पाणी आणि ऊर्जेचा अनन्यसाधारण संबंध आहे. ऊर्जा निर्मितीसाठी पाण्याचा उपयोग केला जातो. पूर्वी पासून व आजही ऊर्जा निर्मितीसाठी सर्वांत प्रथम जलविद्युत प्रकल्पाचाच विचार केला जातो. पण सर्वच ठिकाणी जल विद्युत प्रकल्प उभारण्यास अनुकूल स्थिती नसते. तेंव्हा औष्णीक वीज प्रकल्पाचा किंवा अणूवीज प्रकल्पाचा विचार करण्यात येतो. पण या दोन्ही प्रकल्पांसाठी कोळसा, गॅस, तेल किंवा अणूपासून केवळ उष्णता निर्माण केली जाते. त्यावर पाणी तापवून त्यापासून वाफ तयार करतात आणि त्या वाफेवर जनरेटर चालवून वीज निर्मिती केली जाते. त्यामुळे पाण्याशिवाय वीज ही कल्पना करता येत नाही. पवन ऊर्जा, सैार उर्जेचे प्रकल्प या प्रमाणात परवडत नाहीत त्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. याशिवाय छोटे छोट पोर्टेबल जल विद्युत प्रकल्प उभारुन वीज निर्मिती क्षमता वाढवता येते किमान पावसाळयाचे चार महिने तरी खूप ठिकाणी जलविद्युत प्रकल्प उभारता येतील व अस्वच्छ पाणी शुद्ध करुन तसेच तेच तेच पुन्हा वर्तूळाकार पद्धतीने वापरुन विद्युत निर्मितीची क्षमता वाढवता येते.
पाणी व औद्योगिकरण :
प्रत्येक उत्पादनासाठी पाण्याची मोठी गरज असते. काही उद्योगांना भरपूर पाणी लागते तर काहीना कमी पाणी लागते. पण पाण्याशिवाय औद्योगिक विकास अशक्य आहे व औद्योगिकीकरण लोकसंख्या वाढीमुळे आवश्यक बाब आहे. सामाजिक, आर्थिक विकासासाठी तसेच वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी औद्योगिकीकरणाचा विकास होणे गरजेचे आहे.
पर्यायाने पाण्याशिवाय औद्योगिकीकरण अशक्य आहे. आर्थिक उन्नतीसाठी व शाश्वत विकासासाठी आता शेतीचेही औद्योगिकीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे जलसंधारणाची कामे व इतर मार्गाने औद्योगिकीकरणाबरोबर जलसाठ्यांचे संरक्षण व वृद्धी करणे आवश्यक आहे.
पाणी व शहरीकरण :
सध्या शहरीकरणाचा वेग फार वाढला आहे. दर दोन माणसातील एक शहरांमध्ये रहात आहे. जगातील एकूण शहरीकरणांपैकी 93 टक्के शहरीकरण विकसनशील देशात होत आहे. छोट्या भूभागावर लोकसंख्येची घनता मोठ्या प्रमाणात वाढत जात आहे. त्यामुळे पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे, शहरातील सांडपाण्याचे विल्हेवाट लावणे, घन कचरा व्यवस्थापन करणे असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पाणीपुरवठ्याची व्यवस्था केलेली असूनही गळतीमुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. पाणी प्रदूषण प्रश्नही गंभीर झाला आहे, अनेक शहरे नद्यांच्या काठी आहेत. शहरातील वापरलेले व औद्योगिक क्षेत्राचे सांडपाणी त्यात
सोडल्यामुळे ते प्रदूषित झाले आहे. शुद्धीकरण यंत्रणा उपलब्ध नाही त्यामुळेही वापरायोग्य पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शाश्वत विकास होणे कठीण झाले आहे. म्हणून पाण्याचा कमी वापर करणे, पाण्याच्या पुनर्वापराचा प्रयत्न होणे आवश्यक आहे.
पाणी व निसर्ग :
पाणी आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. संपूर्ण जीवावरणाची निर्मितीच पाण्यापासून झाली आहे. सर्व परिसंस्था जंगल परिसंस्था, पाणस्थाळ जमीन परिसंस्था, गवताळ प्रदेश, परिसंस्था या गोड्या-ताज्या पाण्याच्या जागतिक जलचक्राच्या केंद्रस्थानी आहेत. संपूर्ण ताज्या पाण्याचे जलचक्र हे परिसंस्थाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे. म्हणून पर्यावरण पूरक शाश्वत विकासाकडे वळणे काळाची गरज आहे.
मानवी समाजाच्या दृष्टीने पाणी पोषक अन्नपुरवठा करण्यात आणि व्यवसाय रोजगार उपलब्ध करून देण्यात अग्रेसर असते. त्यामुळे पाण्याचे दीर्घकालीन नियोजन आणि विकास करावयाचा असेल तर परिसंस्था आधारित व्यवस्थापनाचीच कास धरावी लागेल तरच सर्व प्रकारचा शाश्वत विकास शक्य आहे.
पाणी व समानता :
सर्व मानव जातीचे कल्याण व्हायचे असेल तर समन्यायी तत्त्वांवर सर्वच संसाधनाचे वितरण व्हायला हवे. पाणीसुद्धा त्याच तत्त्वावर वितरित होणे महत्त्वाचे आहे. आजच जगाची रित आहे 80 टक्के संसाधने 20 टक्के लोक उपभोगतात तर 20 टक्के संसाधने 80 टक्के लोकांच्या वाट्याला येत आहेत. समानतेचा नुसता नारा देऊन उपयोग नाही तर कृती व्हायला पाहिजे तरच जागतिक मानव जात सुखी व संपन्न होईल. या असमान स्थितीमुळे युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे.
तिसरे महायुद्ध पाण्यामुळेच होईल असे भाकितही केले जात आहे. त्यामुळे शाश्वत
विकास व जागतिक शांततेसाठी पाणीसंवर्धन समान वाटप केले तरच शाश्वत विकास होईल.
वरील घटकांच्या आधारे शाश्वत विकासात पाणी किती महत्त्वाचे आहे याची कल्पना आपणास येते. पाण्याअभावी कोणत्याही प्रकारचा विकास अशक्य आहे. प्रत्येक गोष्ट ही पाण्यावरच अवलंबून आहे. जागतिक पातळीवर पाण्याच्या संवर्धन वृद्धी व व्यवस्थापनावर विचार होणे गरजेचे आहे, ही सामूहिक आणि वैश्विक स्वरूपाची संकल्पना आहे.
संदर्भ :
- भारताचा समग्र भूगो- सवदी-कोळेकर
- कृषि भूगोल- डॉ. विजया साळुंके
- https://hindi.indiawaterportal.org/
डॉ. पांडुरंग मुंढे, लोकप्रशासन विभाग प्रमुख, कै. व्यंकटरराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव ता.जि. लातूर, मो. 9421381964 Email[email protected]