ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. ज्वारीची लागवड ही रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर केली जाते. रब्बी ज्वारीच्या खाण्यासाठी व गुरांना कडबा म्हणून उपयोग केला जातो. ज्वारी पिकाच्या विविध जाती अस्तित्वात असून संशोधन संस्थेने आणि कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या जातींचा गुणवैशिष्ट्यानुसार विचार करून त्याचा लागवडीसाठी वापर करणे गरजेचे आहे.
वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्य गरज भागविण्यासाठी उपलब्ध भूधारण क्षेत्रावर अधिक उत्पादन देणाऱ्या रब्बी ज्वारीचे सुधारित व संकरित वाणांची लागवडीसाठी निवड करून उत्पादन घेतल्यास निश्चितपणे उत्पादनात स्थिरता आणता येऊ शकते.
ज्वारीचे सुधारित व संकरित हे वाण रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देणारे आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना ज्वारीसाठी कृषि विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या रब्बी ज्वारीच्या सुधारित व संकरित जातींचा वापर करणे अगत्याचे आहे.
मागील काही वर्षांच्या तुलनेत सतत हवामानात अनुकूल वा प्रतिकूल बदल होत आहे. यामुळे पीक उत्पादनात शाश्वतता आणणे कठीण झालेले आहे. तसेच पिकांच्या वाढीच्या अवस्थेत कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भावामुळे ज्वारीचे उत्पादनात घट येत आहे. परिणामी प्रती एकरी व हेक्टरी ज्वारीची उत्पादकता व उत्पादन स्तर कमी आहे. यालाच जबाबदार फक्त हवामान व कीड-रोग नाहीतर पिकांच्या सुधारित व संकरित वाणांची सुद्धा उत्पादन पातळी वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका असते.
याच उद्देशाने रब्बी ज्वारीचे सुधारित व संकरित वाण हा लेख तयार करून महाराष्ट्रात तमाम शेतकऱ्यांना ज्वारीच्या वाणांची माहिती उपलब्ध व्हावी, पिकांचे नियोजन करता यावे, कोणत्या वाणांचे उत्पादन अधिक आहे, वाण कीड व रोगांना प्रतिकारक्षम आहेत, पिकांचा परिपक्व होण्याचा कालावधी किती आहे, इत्यादीचे नियोजन करण्यासाठी हा लेख उपयुक्त ठरणार आहे.
अ) रब्बी ज्वारीच्या सुधारित जाती
1) परभणी मोती (एस. पी. व्ही. 1411)
परभणी मोती हा वाण वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रसारित केला आहे. हा वाण परिपक्व होण्यास 120-125 दिवस एवढा कालावधी लागत असून, याचे प्रति एकरी उत्पन्न 8-10 क्विंटल तर, एकरी कडब्याचे उत्पादन (क्विंटल) 18-20 इतके आहे. हा वाण मोत्यासारखा टपोरे व चमकदार दाणे, भाकरीची व कडब्याची प्रत उत्तम, पाण्यास व खतास प्रतिसाद देणारा आहे.
कालावधी : 120-125 दिवस
उत्पन्न : 8-10 (कोरवाहू) प्रती एकरी
गुणवैशिष्टये : एकरी कडब्याचे उत्पादन क्विंटल 18-20 इतके आहे. हा वाण बागायती लागवडीसाठी शिफारस. मावा किडीस प्रतिकारक्षम, उंच वाढणारे पण जमिनीवर लोळण्यास प्रतिकारक्षम, भाकरी व कडब्याची प्रत उत्तम आहे.
2) परभणी ज्योती (एस. पी. व्ही. 1595)
कालावधी : 122-125 दिवस
उत्पन्न : 10-12 (कोरवाहू) प्रती एकरी
गुणवैशिष्टये : एकरी कडब्याचे उत्पादन क्विंटल 24-28 इतके आहे. हा वाण बागायती लागवडीसाठी शिफारस. मावा किडीस प्रतिकारक्षम, उंच वाढणारे पण जमिनीवर लोळण्यास प्रतिकारक्षम, भाकरी व कडब्याची प्रत उत्तम आहे.
3) फुले चित्रा
कालावधी : 122-125 दिवस
उत्पन्न : 12 (कोरवाहू) प्रती एकरी
गुणवैशिष्टये : एकरी कडब्याचे उत्पादन क्विंटल 24 इतके आहे. हा अवर्षणग्रस्त भागात तग धरू शकतो, तसेच खोडमाशी व खोडकिड्यास प्रतिकारक्षम असून भाकरी व कडब्याची प्रत उत्तम.
4) फुले यशोदा (एसपीव्ही-1359)
कालावधी : 122-125 दिवस
उत्पन्न : 10-12 (कोरवाहू) प्रती एकरी
गुणवैशिष्टये : एकरी कडब्याचे उत्पादन क्विंटल 28-30 इतके आहे. धान्य व कडब्याची भरपूर उत्पादन देणारा वाण, भाकरी व कडब्याची प्रत उत्तम, खोडमाशीस व खडखड्या रोग प्रतिकारक्षम आहे. ही जात बागायतीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.
5) फुले वसुधा
कालावधी : 120-122 दिवस
उत्पन्न : 10-12 (कोरवाहू) प्रती एकरी
गुणवैशिष्टये : एकरी कडब्याचे उत्पादन क्विंटल 21-22 इतके आहे. कोरडवाहू व बागायतीसाठी उत्तम वाण खतास चांगला प्रतिसाद कडब्याची प्रत मालदांडी सारखी सरस, खोडमाशी व खडखड्या रोग प्रतिकारक्षम आहे.
6) फुले उत्तरा
कालावधी : 118-120 दिवस
उत्पन्न : 10-12 (कोरवाहू) प्रती एकरी
गुणवैशिष्टये : एकरी कडब्याचे उत्पादन क्विंटल 16-18 इतके आहे. रब्बी हंगामात हुरड्यासाठी प्रसारीत केलेला वाण मध्यम आकाराचा गोड व रूचकर हुरडा, तसेच कणसातील दाणे सहजरित्या वेगळे करता येतात.
7) एसजीएस 8-4
कालावधी : 118-120 दिवस
उत्पन्न : 10-12 (कोरवाहू) प्रती एकरी
गुणवैशिष्टये : एकरी कडब्याचे उत्पादन क्विंटल 18-20 इतके आहे. रब्बी हंगामात हुरड्यासाठी प्रसारीत केलेला वाण मध्यम आकाराचा गोड व रूचकर हुरडा, तसेच कणसातील दाणे सहजरित्या वेगळे करता येतात.
8) सीएसव्ही-14 आर (एसपीव्ही-504)
कालावधी : 115-120
उत्पन्न : 20-22 (कोरवाहू) 32-36 (बागायती) प्रती एकरी
गुणवैशिष्टये : भारी जमिनीसाठी योग्य, दाणे मध्यम ते गोल व मोत्यासारखे चमकदार, खोडमाशीस प्रतिबंधक, पाण्याचा ताण सहन करणारी व मालदांडीपेक्षा 10 ते 15 टक्के अधिक उत्पादन देणारी, बागायतीसाठी सुद्धा उपयुक्त.
9) फुले माऊली (आरएसएलजी-262) :
कालावधी : 116-122
उत्पन्न : 8-10 (कोरडवाहू) प्रती एकरी
गुणवैशिष्टये : प्रामुख्याने हलक्या जमिनीकरिता शिफारस, अवर्षणग्रस्त परिस्थितीत हा वाण तग धरू शकतो. खोडमाशी तसेच खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
ब) रब्बी ज्वारी संकरित जाती
सीएसएच-19 आर (एसपीएच-1010) मालदांडी, (एम-35-1), स्वाती (एसपीव्ही-504) आहेत.
1) सी.एस.एच.19 आर
जमीन : मध्यम ते भारी जमीन
हवामान : समशितोष्ण हवामान
पेरणी हंगाम : रब्बी हंगाम
लागवड कालावधी : लागवडीचा कालावधी 25 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर
प्रती एकर बियाणे : 3 ते 4 किलो / एकर
कालावधी : 115 ते 120 दिवस
उत्पादकता : धान्य उत्पादन: 38 ते 40 क्विंटल प्रती हेक्टर व कडबा उत्पादन : 85 ते 85 क्विंटल प्रती हेक्टर
गुणवैशिष्टये : रब्बी ज्वारीचा धान्य व कडबा असे दुहरी उद्दीष्ट असणारा वाण. बीजोत्पादन करण्यास सोपे. या वाणाच्या नर व मादी वाणाची पेरणी वेळामध्ये अंतर ठेवण्याची गरज नाही.
2) पी.के.व्ही. क्रांती
जमीन : मध्यम ते भारी जमीन
हवामान : समशितोष्ण हवामान
पेरणी हंगाम : रब्बी हंगाम
लागवड कालावधी : लागवडीचा कालावधी 25 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर
बियाणे : 3 ते 4 किलो प्रती एकर
कालावधी : 120 ते 125 दिवस
उत्पादकता : धान्य उत्पादन: 25 ते 30 क्विंटल प्रती हेक्टर व कडबा उत्पादन: 70 ते 75 क्विंटल प्रती हेक्टर
गुणवैशिष्टये : रब्बी ज्वारीचा धान्य व कडबा असे दुहरी उद्दीष्ट असणारा वाण. बीजोत्पादन करण्यास सोपे. या वाणाच्या नर व मादी वाणाची पेरणी वेळामध्ये अंतर ठेवण्याची गरज नाही.
रब्बी ज्वारीचे वाणामुळे होणारे फायदे
- ज्वारीच्या प्रती एकरी व हेक्टरी उत्पादनात वाढ होते.
- पीक कीड व रोगांपासून मुक्त राहते.
- बियाण्यांवर होणारा अनाठायी खर्च कमी करता येतो.
- शुद्ध व दर्जेदार ज्वारीचे उत्पादन घेता येते.
- ज्वारीच्या उत्पादनात स्थिरता आणता येते.