सूर्यफुलाचा जगातील तेलबिया पिकांमध्ये तिसरा क्रमांक लागतो एकूण तेलबिया क्षेत्रापैकी २८ टक्के क्षेत्र सूर्यफुलाने व्यापले आहे. एकूण खाद्यतेल यापैकी १० टक्के उत्पादन सूर्यफुलापासुन मिळते. महाराष्ट्रात प्रामुख्याने संपूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर सोलापूर, विदर्भातील बुलढाणा अमरावती या जिल्ह्यात प्रामुख्याने घेतले जाते. एकूण क्षेत्राचा विचार करता ७० टक्के क्षेत्र मराठवाड्यात आहे. महाराष्ट्रात सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता ७२७ किलो प्रति हेक्टर आहे.
सूर्यफूल सूर्यप्रकाशात संवेदनशील नसल्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात घेता येणारे महत्वपूर्ण तेलबिया पीक आहे. पाण्याअभावी जर खरिपाची पेरणी लांबली तर खरिपातील मुख्य पिकाला पर्याय म्हणून सूर्यफुलाची पेरणी केली जाऊ शकते. अल्प पाण्यात येणारे तसेच कमी उत्पादन खर्च यासारख्या वैशिष्ट्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना परवडणारे पीक आहे.
सुर्यफूल हे महत्त्वाचे तेलवर्गीय पीक आहे. सुर्यफुलाच्या तेलाचा दैनंदिन खाद्य पदार्थातील वाढता वापर लक्षात घेता उपलब्ध जमीन क्षेत्रातून दर्जेदार उत्पन्न कसे वाढवावे व देशाच्या वाढत्या लोकसंख्येला तेलाची गरज भागविण्यासाठी सुर्यफूल पिकाचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविणे आवश्यक असल्याकारणाने सूर्यफुल लागवड कशी करावी, सुधारित लागवड तंत्रज्ञान कसे वापरावे, सुधारत जाती, कीड व रोग व काढणीपश्चात्त व्यवस्थापन इ. महत्त्वाच्या बाबी शेतकरी बांधवांना माहिती होण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील सुर्यफूल उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रस्तुत लेखाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे.
जमीन कशी निवडावी ?
सूर्यफुल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही.
पूर्वमशागत कशी करावी ?
जमिनीची खोल नांगरट करून त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे.
पेरणीची कधी करावी ?
खरीप – जुलै पहिला पंधरवडा, रब्बी – ऑक्टोबर पहिला पंधरवडा ते नोव्हेंबर पहिला पंधरवडा व उन्हाळी – फेब्रुवारी पहिला पंधरवडा
पेरणीचे अंतर किती ठेवावे ?
मध्यम ते खोल जमिनीत – ४५ सें.मी. x ३० सें.मी., भारी जमिनीत – ६० सें.मी.x ३० सें.मी. तसेच संकरित वाण आणि जास्त कालावधीच्या वाणाची लागवड ६० सें.मी.x ३० सें.मी. अंतरावर करावी.
पेरणी पद्धत कोणती वापरावी ?
कोरडवाहू सुर्यफूलाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते. बियाणे ५ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने करावी.
बियाणे प्रमाण किती वापरावे ?
सुर्यफूलाच्या पेरणीसाठी सुधारित वाणाचे ८ ते १० किलो बियाणे आणि संकरित वाणाचे ५ ते ६ किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे.
बीजप्रक्रिया कशी करावी ?
केवडा रोग टाळण्यासाठी ६ ग्रॅम अॅप्रॉन ३५ एस. डी. प्रति किलो बियाण्यास चोळावे. तसेच विषाणूजन्य (नक्रॉसिस) रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडॅक्लोप्रिड ७० डब्लू. ए. गाऊचा ५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. त्यानंतर अँझोटोबॅक्टर हे जिवाणू खत २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.
आंतरपीक कसे घ्यावे ?
आंतरपीक पद्धतीत सुर्यफूल + तूर (२:१ किंवा २:२) आणि भूईमूग + सुर्यफूल (६:२ किंवा ३:१) या प्रमाणात ओळीने पेरणी केल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.
रासायनिक खते कसे द्यावे ?
कोरडवाहू पिकास प्रति हेक्टरी २.५ टन शेणखत तसेच ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे. बागायती पिकास प्रति हेक्टरी ६० किलो नत्र + ६० किलो स्फूरद + ६० किलो पालाश द्यावे. यापैकी ३० किलो नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेल्या ३० किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूख खतात मिसळून द्यावे.
आंतरमशागत कशी करावी ?
पेरणीनंतर १५ ते २०दिवसांनी दोन रोपातील अंतर ३० सें.मी. ठेऊन विरळणी करावी. पेरणीनंतर १५ दिवसांनी एक खुरपणी तसेच दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणीनंतर २० दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४० दिवसांनी करावी.
पाणी व्यवस्थापन कसे करावे ?
सूर्यफूलाच्या पिकास संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. सुर्यफूलाच्या संवेदनक्षम अवस्था
१. रोप अवस्था
२. फुलकळी अवस्था
३. फुलोऱ्याची अवस्था
४. दाणे भरण्याची अवस्था
या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात व उत्पादनात घट येते.
पीक संरक्षण कसे करावे ?
विषाणूजन्य रोग हा रस शोषणाऱ्या फुलकिड्यांमार्फत होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी इमिडोक्लोप्रिड १७.८ % एस.एल. २ मिली । १० लीटर पाणी या प्रमाणात पेरणीनंतर १५ दिवसाच्या अंतराने तीन वेळा फवारण्या कराव्यात. केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी अळ्यांचे पुंजके वेचून रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा.
काढणी कशी करावी ?
सुर्यफूलाची पाने, देठ व फूलाची मागील बाजू पिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी. कणसे चांगली वाळवून नंतर मळणी करावी.
उत्पादन किती मिळते ?
कोरडवाहू पिकापासून प्रति हेक्टरी ८ ते १० क्विंटल, संकरित वाणापासून १२ ते १५ क्विंटल आणि बागायती / संकरित वाणापासून प्रति हेक्टरी १७ ते २० क्विंटल उत्पादन मिळते.
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर
सूर्यफुल लागवड कशी करावी ? हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करून सहकार्य करावे. धन्यवाद !