Friday, December 6, 2024

Top 5 This Week

Related Posts

शेतीला आधुनिक कृषी यांत्रिकीकरणाची गरज

आज हवामानातील प्रतिकूल बदल आणि पावसाच्या लहरीपणामुळे शेतीतील उत्पन्न व उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यातच सर्वत्र बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि याउलट शेतीमध्ये मजुर टंचाई कायम भेडसावत आहे. याचाच परिणाम म्हणून बहुतांशी शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आज सुद्धा कुशल किंवा अकुशल शेतमजुरावर अवलंबून राहावे लागत आहे.

शेती यांत्रिकीकरण म्हणजे काय?

शेती यांत्रिकीकरण म्हणजे कृषी कार्यांसाठी आधुनिक यंत्रांचा वापर पारंपारिक मार्ग बदलून मानव व प्राणी श्रम यांचा समावेश आहे. शेतीचे यांत्रिकीकरण म्हणजे सुधारित अवजारे / यंत्रे वापरुन शेतीकामे वेळच्या वेळी, अधिक कार्यक्षमतेने व फायदेशीररित्या करणे होय.

आधुनिक कृषी औजारांची गरज ?

  • आज देशामध्ये कृषि अवजारे व यंत्रे यामध्ये लक्षणीय वाढ झाली असताना देखील अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांमध्ये यांचा अवलंब खूप कमी असल्याचे दिसून येते. पुष्कळशा शेतकऱ्यांजवळ स्वत:चे बैलदेखील नसतात.
  • सुधारित अवजारे शेतकऱ्यांनी न वापरण्याची अनेक कारणे आहेत. त्यांपैकी प्रमुख कारण म्हणजे लहान शेतकरी जास्त किमतीची अवजारे व यंत्रे खरेदी करु शकत नाहीत तसेच बऱ्याच अवजारांचा वापर वर्षातील काही ठराविक दिवसच होऊ शकतो. 
  • पिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी त्या शेतीची योग्य प्रकारे मशागत करणे गरजेचे आहे. सुधारित अवजारांच्या वापराने पिकाच्या उत्पन्नात 15 ते 20 टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे. यासाठी खेडयांमध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांची सहकारी संस्था स्थापन करुन भाडे तत्वावर सुधारित अवजारे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देता येऊ शकतात.
  • काही शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था अगर शेतकरी स्वत:च्या मालकीची सेवा केंद्रे सुरु करु शकतात. अशी केंद्रे ट्रॅक्टर, नांगर, फण, पेरणीयंत्रे, कोळपी, मळणी यंत्रे यांसारखी सुधारित शेती अवजारे विकत घेऊन भाडेतत्वावर इतर शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी देऊ शकतात.
  • त्यांचप्रमाणे ट्रॅक्टरधारक शेतकरीदेखील सर्व प्रकारची सुधारित शेती अवजारे विकत घेऊन इतर शेतकऱ्यांना भाडेतत्वावर देऊ शकतात. त्यांमुळे त्यांच्या ट्रॅक्टरचा वापर वाढून ट्रॅक्टर वापरणे फायदेशीर ठरते. विशेषत: खेडयांमध्ये अशा प्रकारची केंद्रे निर्माण झाल्यांस खेडयांमधील तरुणांना गाव पातळीवरच रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
  • अशा सुधारित सेवा अवजारे केंद्राच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना सर्व प्रकारची अवजारे भाडे तत्वावर माफक भाडे देऊन उपलब्ध होऊ शकतील. शेतकरी आपली शेतीकामे वेळच्या वेळी, अधिक कार्यक्षमतेने व फायदेशीररित्या पूर्ण करु शकतील. यामुळे मजुरावरील आणि इतर खर्च लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो.

कृषी अवजारांची निवड कशी करावी ?

  • सुरुवातीला अवजारांची निवड जमिनीचा प्रकार, त्या क्षेत्रातील मुख्य पिके आणि विशिष्ठ शेतीकामे यांच्या अनुषंगाने करावी. अवजारांची निवड ही यंत्रास लागणारी शक्ती त्याची कार्यक्षमता आणि त्याचा ठराविक  कार्य करण्यास लागणारा वेळ यांवर केलेली असावी.
  • विविध पिकांसाठी जास्तीत जास्त तास चालणारी बहुविध अवजारे निवडून खरेदी करावीत. या सर्व बाबींचा उपयोग शेतकरी/शेतकऱ्याच्या समूहास उपयुक्त अशी यंत्रे त्यांच्या गरजेप्रमाणे जमिनीच्या आकारमानाप्रमाणे आणि ऊर्जा (शक्ती) उपलब्धतेनुसार निवडण्यासाठी होतो.

प्रशिक्षण व अवजारांचा उपयोग

  • सुधारित अवजारे सेवा केंद्र सुरु करण्यापूर्वी सर्व सुधारित अवजारांचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या शेतावर दाखविणे आवश्यक आहे. ज्यांमुळे इतर शेतकऱ्यांमध्ये सुधारित अवजारांच्या वापराबद्दल आणि जागरुकता निर्माण होईल.
  • या संस्थेतील सर्व सदस्यांना किंवा समूहास सुधारित अवजारांचे / यंत्रे चालविण्याचे तसेच कृषि उद्योग चालवण्यासंबधी प्रशिक्षण व मार्गदर्शन करुन त्यामध्ये पारंगत करणे आवश्यक ठरते.
  • त्याचबरोबर हिशेब ठेवणे, रेकॉर्ड तयार करणे या बाबींची माहिती असावी लागते. असे सेवा केंद्र सुरु करु इच्छिणाऱ्या खेडयांतील शेतकरी, तरुण व संस्था यांच्या मार्गदर्शनासाठी शेतीची पेरणीपूर्व मशागत, पेरणी, कुळवणी, पीक सरंक्षक, पिकाची मळणी यांसाठी कोणकोणती अवजारे वापरावीत याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
  • सुधारित यंत्राचा वापर फायदेशीर होण्यासाठी वर्षातील कमीत कमी किती तास हे अवजारे / यंत्र भाड्याने देणे आवश्यक आहे याचाही विचार करणे गरजेचे आहे. अवजारांची संख्या तसेच अवजारांच्या वापराचे तास यामध्ये वाढ झाल्यास नफ्यात वाढ होऊ शकते.

कृषि अवजारांचे भांडवल

  • ट्रॅक्टरधारक शेतकरी हे सुधारित अवजारे सेवा केंद्र कमीत कमी 60 हजार रुपये ते अडीच लाख रुपये इतक्या मुद्दल व 20 टक्के रक्कम सुरुवातीची यंत्रणा प्रस्थापित करण्याकरिता गुंतवून सुरु करु शकतो.
  • ट्रॅक्टर नसलेल्यांसाठी सुरुवातीची गुंतवणुक थोडी जास्त आहे. परंतु शासकीय योजना अंर्तगत काही अनुदानही या सेवा केंद्रास मिळू शकते. सुरुवातीस उल्लेख केल्याप्रमाणे सुधारित अवजारे सेवा केंद्र कोणीही एखादा शेतकरी, शेतकरी मंडळ, सहकारी संस्था, अशासकीय संस्था अथवा इतर संस्थामार्फत चालविले जाऊ  शकते.
  • प्रतिवर्षी एक अथवा अधिक अवजारांची भर पडल्याने मिळणाऱ्या नफ्यामध्ये वाढ होऊ शकते व पूर्ण वर्षभर व्यवसाय चालण्याची शाश्वती राहते.
  • स्थानिक परिस्थितीनुसार गुंतवलेले भांडवल तीन ते पाच वर्षामध्ये परत मिळू शकते. शेतीमध्ये भाडेतत्वावर सुधारित अवजारांच्या शेतीच्या विविध कामांसाठी वापर प्रचलित होत आहे.
  • यापुढे भाडेतत्वार शेतीकामांसाठी अवजारे देणे हा एक फायदेशीर व्यवसाय ठरणार आहे. या योजनेद्वारे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वंयरोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होऊ शकते.

आधुनिक कृषी औजारांचे महत्त्व

  1. अल्‍पभूधारक गटातील शेतकऱ्यांना कृषि अवजारांची माहिती सुलभपणे मिळावी तसेच त्यांचे या अवजारामुळे शेतीचे कामे वेळेवर व सोयीस्कररीत्या होण्यासाठी कृषि अवजारे महत्त्वाची भूमिका बजावतात. 
  2. अत्‍यल्‍पभूधारक गटातील शेतकऱ्यांना कृषि अवजारांची माहिती सुलभपणे मिळावी तसेच त्यांचे या अवजारामुळे शेतीचे कामे वेळेवर व सोयीस्कररीत्या होण्यासाठी कृषि अवजारे महत्त्वाची भूमिका बजावतात. 
  3. बहुवार्षिक गटातील शेतकऱ्यांना कृषि अवजारांची माहिती सुलभपणे मिळावी तसेच त्यांचे या अवजारामुळे शेतीचे कामे वेळेवर व सोयीस्कररीत्या होण्यासाठी कृषि अवजारे महत्त्वाची भूमिका बजावतात. 
  4. शेतीचे काम सुलभ व कार्यक्षम होते कारण सध्या मजूरांचा प्रश्न हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा झालेला आहे. तसेच शेतीचे उत्पन्न हे घटत असल्यामुळे मजूरी देण्यासाठी शेतकऱ्यांची उदासीनता दिसून येते त्यामुळे कृषि अवजारे व यंत्रे हे मत्त्वाची भूमिका आहे.
  5. शेतातील वेगवगेळे कामे उदा. ‍जमिनीची पूर्व मशागत, पिकांची लागवड, आंतर मशागत, धुरळणी, फवारणी, काढणी, मळणी, प्रतवारी इ. कामे हे कमीत वेळात व कमीत श्रमात होते. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक व श्रमाची बचत होते.

आधुनिक कृषी औजारांचे फायदे

  • शेतीतील विविध प्रकारे कामे, पेरणी, लागवड, आंतरमशागत, काढणी, मळणी व वाहतूक हे सुलभपणे करता येते.
  • कमी वेळात व कमी श्रमात अधिक चांगले काम करता येते.
  • मजूरावर अवलंबून राहवयाची गरज भासत नाही.
  • मजुरी खर्चात मोठी बचत होते.
  • कमी वेळामध्ये अधिक क्षेत्रावर लागवड, काढणी व मळणीचे कामे करता येतात.
  • कृषि अवजारांमुळे सिंचनाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे.
  • मालाची गुणवत्ता व दर्जा चांगला राखला जातो.
  • शेतीतील कामे यांत्रिकी पद्धतीने केल्यामुळे मजुरीअभावी शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येते. 

विशेष बाब

केंद्र व राज्यपुरस्कृत विविध योजनांची अमंलबजावणी शासनाकडून करण्यात आली असून थेट शेतकऱ्यांना वेगवेगळे यंत्रे व अवजारे खरेदीपोटी प्रोत्साहन म्हणून शासकीय अनुदान दिले जात आहे. यामुळे शेतकरी बांधवांना जे कामे मजुराकडून करावी लागत होती ती कामे आता यंत्राद्वारे करणे शक्य झाल्याने सध्याच्या शेतीचे उत्पन्न वाढण्यास यांत्रिकरणाचा वाटा अधिक असून शेतीचे चित्र ‍दिवसेंदिवस बदलत जात आहे. आजच्या शेतीला आधुनिक कृषी औजारांची जोड दिल्यास पाश्चात्य देशाप्रमाणे आपणही आपल्या देशाचे कृषि उत्पन्न आधुनिक यांत्रिकीकरणामुळे वाढविणे शक्य होईल.

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

admin
adminhttps://www.ksagrowon.in
Kishor Motiram Sasane, (B.Sc. Agriculture)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles