ग्रामीण विकासात महिला बचतगटांनी चांगली सुरुवात केली असून बचतगटाद्वारे अनेक उद्योग उभारणीस चालना मिळत आहे. महिला बचत गटाची प्रगती व्हावी व विकास वृध्दी होण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा फायदा महिला बचत गटांना होत आहे.
उद्योजकताप्रेरणा अभियानात महिलांना बचतगटांचे महत्त्व, बचत गटांना येणाऱ्या समस्या, बचतगटांमार्फत करता येणारे उद्योग, शासकीय योजना, विविध कर्ज योजना आदी विषयांवर ऊहापोह केला जातो. महिलांना एकजूटी उभे राहण्यास प्रेरित करण्यात येते. उद्योजकता प्रेरणा अभियानामध्ये निवडलेल्या महिलांना व बचतगटांना उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रशिक्षित केले जाते.
या प्रशिक्षणांत महिलांना, उद्योग कसा सुरू करावा, प्रकल्प अहवाल कसा बनवावा, बाजारपेठ सर्वेक्षण कसे करावे, विपणन शास्त्र, विविध शासकीय योजना, कर्ज योजना आदि विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाते, तसेच त्यांना विविध वस्तु बनविण्याचे प्रशिक्षण व सराव दिला जातो. या प्रशिक्षणात अनेक वेळा संस्था शासकीय यंत्रणेचे सहाय्य घेते. केवळ प्रशिक्षण देऊन महिला स्वयंरोजगार सुरू करतील अशी आशा बाळगणे योग्य नसते, त्या साठी सतत पाठपुरवठा लागतो, महिलांना साथ देण्याची गरज असते, त्यांना येणाऱ्या छोट्या मोठ्या समस्येंवर मात करण्यासाठी सदर संस्था सहकार्य व मदत करते.
अ. शासनाच्या तरतुदी
1) माविमशी सलग्न योजना (SGSY)
सुवर्ण जयंती ग्रामस्वरोजगार योजना, केंद्र सरकार संचलित योजना, ग्रामीण विकासयंत्रणेद्वारे राबविली जाते. ही योजना 1999 साली सुरू करण्यात आली. माविममार्फत योजना 2001 पासून चालविली जाते. 31 ग्रामीण जिल्ह्यात फक्त महाराष्ट्रातील ही योजनातून चालू आहे.
2) रमाई महिला सक्षमीकरण योजना (SCP)
सामाजिक न्याय विभागा मार्फत योजना राबविली जाते. या योजनेतून लिंग समभाव, कार्यात्मक साक्षरता, उद्योजकतामार्फत योजना अंमलात आणली जाते. महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यात ही योजना यशस्वीपणे राबविली जाते. सहयोगिनी व सेवाभावी संस्था मार्फत बचतगटामार्फत गटांची स्थापना करून गटांची बचत, कर्ज व व्यवसाय सुरू झाले.
3) आदिवासी विकास प्रकल्प (TSP)
आदिवासी विकास विभागा मार्फत 8 जिल्ह्यासाठी योजना मंजूर करण्यात आली. नाशिक, नंदूरबार, ठाणे, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. आदिवासी महिलांच्या उन्नतीसाठी ही योजना आहे. बचगट स्थापन करणे व त्यांच्याकडून बचत करून घेणे. योग्यतेनुसार शासकीय /खाजगी नोकरी मिळविण्यासाठी सहाय्य. आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी मार्गदर्शन व्यवसाय संधी 1000 रूपये प्रति महा विद्यावेतन अशा विविध सेवा दिल्या जातात. नोकरी करिता नवनोंदणी निमशासकीय आस्थापने विद्यावेतनावर 6 महिने संधी उद्योजकांसाठी सुविधा, आदिवासी उमेदवारांना शासकीय नोकरीकरिता स्पर्धा, परीक्षापूर्व तयारी मार्गदर्शन व प्रशिक्षण सुविधा प्रतिमहा रू. 1000/- विद्यावेतन, नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार तंत्रकरिता घडविण्यासाठी लायब्ररी सुविधा इ.
4) तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम (TSP)
तेजस्वीनी अभियान प्रामुख्याने नागरी व ग्रामीण स्त्रियांना विशेषकरून अनुसूचित जाती, जमातीच्या स्त्रियांना तसेच कुटुंब प्रमुख महिला, विधवा, घटस्फोटित, परित्क्यता, भूमीहीन शेतमजूर महिलांसाठी कार्यरत आहे. बचत गटासाठी दोन पातळीवर आधार आवश्यक असतो. पहिली पातळी म्हणजे सुयोग्य व्यवस्थापन व हिशोब तसेच सुयोग्य सामाजिक व आर्थिक विकास कार्यक्रम दुसरी पातही म्हणजे अशी संघटनात्मक भांडवलवृद्धी प्रशिक्षण बॅंक समन्वय मविमनेद्विस्तरीय स्वीकारून समाज संचलित सहाय्यत केंद्रे स्थापन करण्याची स्वीकारली आहे. CMR हा 150 ते 200 बचतगटांचा समूह (फेडेरशन) असतो. 20-25 कि.मी. परिसरातील 20 गावांचा असतो. आपल्या कार्यक्षेत्रातील बचतगटांना प्रशिक्षण, व्यवस्थापन उद्योजकतायातून अ वर्ग बचत गट बनविण्यासाठी प्रयत्न असतात.
ब. विविध शासकीय संस्था
1) नाबार्ड
राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) हे ग्रामीण भागात स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतात. स्वयंसेवी संस्था ह्या बचत गट स्थापन करतात, त्यासाठी नाबार्डकडून त्यांना आर्थिक व प्रशिक्षण विषयक सर्व सहकार्य मिळत असते. थोडक्यात ग्रामीण भागामध्ये नाबार्ड ही संस्था स्वयंसहाय्यता बचत गट हे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्थापन करते. तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्ह्याच्या तसेच मोठया शहरांच्या ठिकाणी उत्पादित मालाची प्रदर्शने भरवून त्या प्रदर्शनामधून महिलांचा आर्थिक मदत होते.
2) माविम
महिला आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (माविम) ही संस्था ग्रामीण भागात तसेच शहरी भागात महिलांचे स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन करते. या कामामध्ये माविमला त्यांनी नेमलेल्या स्वयंसेवी संस्थांसुद्धा मदत करतात. विशेष म्हणजे तालुका कार्यक्षेत्रात सहयोगिनींच्या मार्फत बचत गटांची स्थापना व गटांना प्रशिक्षण देण्यात येते. बचत गटातील महिलांना स्वयंरोजगारासाठी स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, कामधेनू योजना तसेच केंद्र शासन पुरस्कृत स्वयंसिद्धा योजना यामध्ये माविमकडून मदत होते. बचत गटातील महिलांसाठी प्रदर्शन व मेळावे, महिला जाणीव जागृती कार्यक्रम राबविले जातात. तसेच बचत गटांना वित्त सहाय्य मिळवून देण्याकरिता प्रस्तावांची छाननी करून ते प्रस्ताव राष्ट्रीय महिला कोष यांच्याकडे सादर केले जातात.
3) नगरपरिषद प्रशासन संचालनालय
महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्रातील दारिद्रय रेषेखालील तसेच मागासवर्गीय महिलांसाठी नगरपरिषद प्रशासन संचालनालयातर्फे महिलांचे स्वयंसहाय्यता बचत गट महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्रात स्थापन केले जातात. बचत गटांतील महिलांना शासनाच्या सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेमध्ये स्वयंरोजगारासाठी कर्ज तसेच प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. शहरी भागामध्ये स्थापन झालेल्या बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रदर्शने आयोजित केली जातात.
4) ग्रामीण विकास विभाग
ग्रामीण भागामध्ये दारिद्रय रेषेखालील तसेच अपंग, मागासवर्गीय, महिला यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी ग्रामीण विकास विभागाने स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन करण्याचा उपक्रम सुरू केलेला असून जिल्ह्याचे प्रकल्प संचालक व गट विकास अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून बचत गट स्थापन केले जातात. ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रदर्शने आयोजित केली जातात. तसेच बचत गटातील सभासदांना प्रशिक्षण व स्वयंरोजगारासाठी कर्ज दिले जाते.
क. महिलांसाठी विविध शासकीय योजना
महाराष्ट्र राज्याने 1994 मध्ये महिला धोरण जाहिर केले. दर तीन वर्षानी या धोरणाचा व त्यातील कार्यक्रमाचा आढावा घेऊन त्यात काही बदलही केले. महिला सक्षम करण्यासाठी राज्यात काही निधी उपलब्ध केला आहे.
1) आरोग्य सुधारणा कार्यक्रमाखाली
- मातृत्व अनुदान योजना
- सावित्रीबाई फुले कल्याण योजना
- खाजगी स्त्री रोग कल्याण योजना
2) ग्रामीण भागात अकुशल महिलांना व्यवसाय
- फलोत्पादन प्रक्रिया करणे
- फळे व भाजीपाला सुकवणे
- भरतकाम
- कॉम्प्युटर
- टंकलेखन
- लघु लेखन
- बाहुल्या तयार करणे
- कुत्रे व खेळणी तयार करणे
3) रोजगारा संबंधीत व्यवसाय
- कॉम्प्युटर
- नर्सिंग
- आय.टी.आय.कोर्स
- टेलिफोन ऑपरेटर
4) आर्थिकदृष्टया दुर्बल महिलांना सहाय्य
- भाजीपाला
- फळाचे दुकान
- रस उद्योग
5) इतर योजना
- सुवर्ण जयंत्ती शहरी रोजगार योजना
- स्वयंसेवी संस्थासाठी अर्थसहाय्य योजना
- महिला शिक्षणासाठी योजना
- बालीका विकास योजना
- बायोगॅस प्लँट करता योजना
- कृषि विषयक साधन सामुग्री विकास
- अन्न प्रक्रिया केंद्र उभारणी
- दाळी भरडणे योजना
- महिला काथ्या कारागिरी सहाय्य
- काजू प्रक्रिया योजना
6) देवदासी पुनर्वसन योजना
7) अपातग्रस्त महिलांसाठी इंदिरा गांधी महिला संरक्षण योजना
8) बालिका समृद्धी योजना
बचत गटामुळे होणारे फायदे
- समविचारी महिला एकत्र आल्यामुळे महिलांच्या कला व गुणांना वाव मिळत आहे.
- महिला बचत गट तयार केल्यामुळे महिलांना स्वयंरोजगार मिळत आहे.
- महिलांचे उद्योगातील धाडस व कार्यक्षमता वाढत आहे.
- महिलांना व्यवसायातील भाग भांडवल उपलब्ध होत आहे.
- महिलांना राष्ट्रीयकृत बॅंकींग क्षेत्रातील व्यवहाराची माहिती मिळत आहे.
- बचत गटामुळे महिला लघुउद्योग व स्वयंरोजगार करून सक्षम होत आहेत.
- स्त्री दृष्टीकोनाबाबत पुरूषांच्या मानसिकेतत बदल होत आहे. त्यामुळे त्यांचा कुटुंबातील दर्जा वाढत आहे.
- बचत गटामुळे महिलांचे उद्योग वा व्यवसायातून आर्थिक सशक्तीकरण होत आहे.
संदर्भ ग्रंथ
- मुलायणी एम.यु. (2006)- महिला स्वयंसहाय्यता बचत गट, डायमंड पब्किकेशन, पुणे, 41-47
- मुलायणी एम.यु. अल्पबचत नियोजन (बचत गट), पान क्र. 150-242
- दांडेकर लक्ष्मण व इतर, स्वयंसहाय्यता बचत गट प्रेरक व प्रेरिका प्रमाणपत्र शिक्षणक्रम, य.च.म.मु.वि., नाशिक, पृ. 3-54
- स्वयंसहाय्यता गट विकासासाठीची साधने व समन्वय पान क्र. 197 ते 211
- बचत गटातून कृषि उद्योजक, कृषिभूषण वि.ग. राऊळ, फेब्रुवारी 2017, सुविधा प्रकाशन, सोलापूर, पृ. 96-109