Friday, December 6, 2024

Top 5 This Week

Related Posts

हायड्रोपोनिक चारा युनिटच्या प्रमुख अडचणी

हायड्रोपोनिक तंत्रज्ञान राबवताना बियाण्‍याची निवड, बियाणे भिजत घालण्‍याचा काळ, पाणी व्‍यवस्‍थापन, आर्द्रता नियंत्रणाचे कौशल्‍य, बुरशी नियंत्रणासाठी अवगत असलेली उपाययोजना. अशा बऱ्याच अशा घटकांची केवळ माहिती पुरेशी नसून त्‍याचा प्रत्यक्ष अनुभव शेतकरी पशुपालकांना असणे आवश्यक असते.

प्रत्‍येक भौगोलिक विभागानुसार वातावरण हे बदलत असते व एका ठिकाणचे व्‍यवस्‍थापन जसेच्‍या तसे दुसऱ्या भागासाठी वापरता येणे शक्‍य नसून त्‍यात थोडाफार बदल करणे आवश्‍यक असते. हे जर लक्षात घेतले नाही तर थोड्या कालावधीसाठी आपण उत्‍पादन करु शकू, परंतु नंतर उत्‍पादन काढणे अडचणीचे वाटते. 

बऱ्याच वेळेस शेतकऱ्यास आवड व गरज असल्‍याने पशुपालक शेतकरी आवडीने हायड्रोपोनिक चारा उत्‍पादन करण्‍याचे ठरवतात. एखाद्या यशस्‍वीपणे हायड्रोपोनिक चारा उत्‍पादन करणाऱ्या दूध उत्‍पादकाच्‍या गोशाळेस भेट देतात. नवीन प्रयोग करताना आपल्‍याकडील उपलब्‍ध साधनसामुग्रीचा प्राधान्‍याने वापर करण्‍याकडे कल असतो. त्‍यामुळे अशा तंत्राचा प्रसार झपाट्याने होतो.

कमी खर्चाचे हायड्रोपोनिक चारा उत्‍पादन युनिट पशुपालक उत्‍साहाने तयार करतात. थोड्या कालावधीनंतर वातावरणात बदल होतो, त्‍यानुसार या हायड्रोपोनिक चारा युनि‍टमध्‍ये बदल करणे आवश्‍यक असते. परंतु असे बदल करण्‍याबाबत माहिती नसल्‍यामुळे त्‍या प्रमाणात त्‍यांना उत्‍पादन मिळत नाही.

अशा प्रकारांत बुरशी होण्‍याचे प्रमाण वाढते व दूध उत्‍पादक हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उत्‍पादन घेणे थांबवतो, असा अपप्रचार होतो की आपल्‍या भागात हायड्रोपोनिक चारा उत्‍पादन होत नाही किंवा हे तंत्रज्ञान योग्‍य नाही. त्‍यामुळे कमी खर्चातील हायड्रोपोनिक चारा उत्‍पादन घेताना वर्षातील सर्व ऋतूमध्‍ये कसे बदल करावेत, काय खबरदारी घ्‍यावी, याची माहिती घेणे आवश्‍यक असते.

या पद्धतीने चारा उत्‍पादनात यशस्‍वी असणाऱ्या दूध उत्‍पादकांबरोबर वर्षभर संपर्कात राहून आपणास नियमितपणे येणाऱ्या अडचणींवर चर्चा करणे आवश्‍यक असते. असे केल्‍यास हायड्रोपोनिक चारा युनिटहे तंत्र फार सोपे व फायद्याचे वाटेल. 

हायड्रोपोनिक चारा युनिटच्या अडचणी

प्रस्तुत लेखात शेतकरी पशुपालकांना हायड्रोपोनिक चारा युनिटच्या अडचणी या विषयी माहिती देण्यात येत असून त्यामध्ये बियाण्‍यांची गुणवत्ता व रोगाचा प्रादुर्भाव तसेच हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उत्‍पादन करताना घ्‍यावयाची काळजी, हायड्रोपोनिक चारा युनिटला हवामानातील होणारे बदल आणि आपले हायड्रोपोनिक युनिट कसे असावे, हायड्रोपोनिक चारा युनिटमुळे होणारे शेतकऱ्यांचे फायदे याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात येत आहे.

1) बियाण्‍यांची गुणवत्ता : 

हायड्रोपोनिक चारा युनिटमध्‍ये गुणवत्तायुक्‍त चारा तयार करण्‍यासाठी योग्‍य बियाण्‍याची उपलब्‍धता होणे फार महत्‍वाचे आहे. सध्‍या आधुनिकीकरणामुळे आपण मळणी यंत्राने काम करतो, परंतु त्‍याचे व्‍यवस्‍थापन व्‍यवस्थितपणे न केल्‍यास बियाण्‍याच्‍या अंकुरास बाधा पोहोचते. असे बियाणे नंतर हायड्रोपोनिक युनिटमध्‍ये अंकुरित होत नाही. त्‍याची वाढ न होतो ते बुरशी वाढीसाठी मदत करतात व आपले नुकसान होऊ शकते. यासाठी हाताने मळणी केलेले बियाणे मिळणे महत्‍वाचे आहे किंवा यंत्रावर मळणी केल्‍यास मळणी यंत्राची मळणी योग्‍य असणे आवश्‍यक आहे.

चांगल्‍या गुणवत्तेच्‍या बियाण्‍याचे नियोजनही आपणास जमले पाहिजे. अन्‍यथा बऱ्याच हायड्रोपोनिक चारा उत्‍पादन करणाऱ्या पशुपालकांना चांगल्‍या बियाण्‍याची उपलब्‍धता न झाल्‍यामुळे हायड्रोपोनिक चारा उत्‍पादन बंद ठेवावे लागले आहे. या अडचणीचे योग्‍य नियोजन करण्‍यासाठी शक्‍यतो आपल्‍या शेतातच मक्‍याचे उत्‍पादन घ्‍यावे; किंवा परिचीत शेतकऱ्यांकडून ज्‍यांच्‍याकडील मळणी पद्धतीविषयी आपल्‍याला खात्री आहे, अशांकडून मका खरेदीचे नियोजन करुन घ्‍यावे.

2) रोगाचा प्रादुर्भाव :

हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उतपादन घेताना त्‍याची गुणवत्ता राखणे महत्‍त्‍वाचे आहे. यामध्‍ये सर्वात जास्‍त अडचण महणजे जर व्‍यवस्थित काळजी घेतली नाही तर बुरशी होण्‍याची शक्‍यता जास्‍त असते. यामुळे बरेच दूध उत्‍पादक उपलब्‍ध माहिती घेऊन चांगले हायड्रोपोनिक चारा उत्‍पादन घेतात; परंतु नंतर बुरशी व इतर रोगनिवारणाची पूर्ण माहिती नसल्‍याने चारा उत्‍पादन घेण्‍याचे बंद करतात. याबाबतची अडचण दूर करण्‍यासाठी रोगनियंत्रणासाठी खाली दिलेल्‍या उपायांची माहिती घेऊन त्‍यांचे योग्‍य नियोजन व काळजी घेणे आवश्‍यक आहे.

हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उत्‍पादन करताना घ्‍यावयाची काळजी :

हायड्रोपोनिक चारा युनिटमधून चारा उत्‍पादन घेण्‍याचे अनेक फायदे पशुपालकांना जाणवल्‍यामुळे आता या पद्धतीकडे कल वाढल्‍याचे दिसून येत आहे. एकदम सध्‍या पद्धतीचे हायड्रोपोनिक युनिट पाहिल्‍यानंतर त्‍यांच्‍या मनात अशा पद्धतीने चारा उत्‍पादन घेण्‍याबाबतची मानसिकता तयार होते. ज्‍या सोप्‍या पद्धतीने ही यंत्रणा तयार केलेली आहे, त्‍याच प्रमाणात  त्‍यामध्‍ये वातावरण नियंत्रणासाठी घ्‍यावी लागणारी आवश्‍यक ती काळजीसुद्घा घेतलेली आहे. अनेक जण नेमके हेच विसरतात. थोडे दिवस चांगले नियोजन करतात. त्‍यांना अशा हायड्रोपोनिक चारा उत्‍पादनातून लाभही होतो. परंतु काही दिवसानंतर वातावरणात खालीलप्रमाणे बदल होतात-

तापमान सतत कमी जास्‍त होते.

बियाणे निकृष्ट व व्‍यवस्थित नसते.

स्‍वच्‍छता व्‍यवस्थित नसते.

पाण्‍याची गुणवत्ता चांगली नसते.

कोंदट वातावरण तयार होते.

हवेत आर्द्रता जास्‍त होते.

अशा अनेक कारणांनी चारा उत्‍पादन आवश्‍यकतेनुसार मिळत नाही व पशुपालकांची चलबिचल चालू होते. अशाही पद्धतीत काही पशुपालक त्‍यामध्‍ये शास्‍त्रीय दृष्‍टीकोनातून काही बदल करुन आपले हायड्रोपोनिक चारा उत्‍पादन वर्षांच्‍या तीनही हंगामात यशस्वीपणे सुरु ठेवतात. 

मात्र, काही पशुपालकांना याबाबत असलेल्‍या अपुऱ्या माहितीमुळे चारा उत्‍पादनातील सातत्‍य टिकवता येत नाही ते असे उत्‍पादन घेणे बंद करतात. आपल्‍या वातावरणात हायड्रोपोनिक चारा उत्‍पादन येत नाही असा अपप्रचारही केला जातो. यशस्‍वी पशुपालकांनी केलेल्या हायड्रोपोनिक चारा उत्‍पादनाची पद्धत उपयोगात आणल्‍यास आपल्‍या भागात हे तंत्रज्ञान पूर्णपणे यशस्‍वी ठरु शकेल. बऱ्याच पशुपालकांना वरील विषयांची जाणीव करुन दिल्‍याने ते हायड्रोपोनिक चारा उत्‍पादनात यशस्‍वी झाले आहेत. वातावरणानुसार बदल करुन, अडचणींवर मात करत त्‍यांनी हे तंत्र वापरुन आपला फायदा करुन घेतला आहे.

आपल्‍या भागातील संपूर्ण वातावरणाचा वर्षभराचा अभ्‍यास लक्षात घेऊन आपले हायड्रोपोनिक युनिट कसे असावे, याचा आपणास निर्णय घेता येईल. यामध्‍ये सर्वात महत्‍त्‍वाचे घटक खालीलप्रमाणे आहेत.

आपणास वर्षभर चांगल्‍या बियाण्‍याची (बियाण्‍यांची गुणवत्ता व मुद्यांमध्‍ये दिलेल्‍या माहितीप्रमाणे) उपलब्‍ध कशी होईल, हे पावे लागते. जर आपल्‍याकडे बियाण्‍यांची अडचण असेल तर परिचित शेतकऱ्यांकडून आपल्‍या निकषाप्रमाणे बियाण्‍याची उपलब्‍धता करुन घेणे महत्‍त्‍वाचे आहे.

आपल्‍या भागात पर्जन्‍यमान किती आहे व त्‍यानुसार हायड्रोपोनिक चारा उत्‍पादनाची कशी काळजी घ्‍यावयाची, याची माहिती घेणे आवश्‍यक आहे.

आपल्‍या भागातील तापमान जास्‍तीत जास्‍त व कमीत किती आहे या विषयावरही चर्चा करुन कमी जास्‍त होणाऱ्या तापमानाशी कसे जुळवून घेता येईल, याची माहिती घ्‍यावी.

काही जास्‍त पर्जन्‍यमान असलेल्‍या किंवा समुद्रालगताच्‍या भागात आर्द्रता नियंत्रणाचे काम महत्‍त्‍वाचे असते. ते योग्‍य प्रकारे करण्‍यासाठी या तंत्रज्ञानाची चांगली माहिती घेऊन जास्‍तीत जास्‍त चारा उत्‍पादन घेता येईल व उत्पादनातील सातत्‍यही ठेवता येईल.

बऱ्याच वेळेस जास्‍त आर्द्रता झाल्‍यास व वायुजा (हवा खेळती राहील अशी व्‍यवस्‍था) कमी असल्‍यास लहान किडे होण्‍याची शक्‍यता वाढते. त्‍यामुळे याबाबतच्‍या उपाययोजनांची माहिती असणे सातत्‍यपूर्ण यशस्‍वी हायड्रोपोनिक चारा उत्‍पादनासाठी आवश्‍यक आहे.

हायड्रोपोनिक चारा युनिटमुळे होणारे फायदे

पशुधनासाठी वर्षभर सातत्याने चारा निर्मिती करता येत असल्यामुळे हंगामी चारा पिकांवर अवलंबून राहावयाची गरज नाही.

या पद्धतीने जनावरांना सकस व गुणवत्तायुक्त चारा खाण्यास मिळतो.

पशुपालकांना अन्य प्रकारचा चारा खरेदीवर होणारा खर्च टाळता येतो.

या पद्धतीने चांगल्या प्रकारे दूध उत्पादन व इतर उत्पादने घेता येतात.

हायड्रोपोनिक चारा निर्मिती तंत्राचा अवलंब केल्यास दूध उत्पादनात वाढ होते.

विशेष संदर्भ

डॉ. एस. पी. गायकवाड (2017),  कमी खर्चाचे चारा उत्‍पादन तंत्र हायड्रोपोनिक, सकाळ प्रकाशन, पुणे.

www.agrowon.com

www.sakal.com


शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर तथा वेबसाईट ॲडमीन : https://www.agrimoderntech.in/

हायड्रोपोनिक्स तंत्राने चारा निर्मिती फायदेशीर हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

उपयुक्‍त लेख वाचण्‍यासाठी इथे क्लिक करा

हायड्रोपोनिक्सतंत्राने चारा निर्मिती फायदेशीर

पशुखाद्य चारा निर्मिती : समस्या व उपाय 

admin
adminhttps://www.ksagrowon.in
Kishor Motiram Sasane, (B.Sc. Agriculture)

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles