दूध हे मानवी आहारातील महत्त्वाचा घटक असून दुधाला पूर्णान्न असे म्हटले जाते. लहान मूल , थोर किंवा ज्येष्ठ व्यक्तींच्या दैनंदिन आहारात दूध व दुधापासून तयार झालेल्या पदार्थांचा समावेश केला जातो. यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांना मानवी आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
महाराष्ट्रात दुधाचे उत्पादनात चांगली वाढ झाली असून ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस दरडोई दुधाची मागणी वाढत जात आहे. मात्र शुद्ध व गुणवत्तायुक्त दुधाची बाजारात टंचाई भासत आहे. दुधामध्ये सध्याच्या काळात भेसळ करण्याचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे ग्राहकांना शुद्ध व दर्जेदार दूध मिळत नाही. परिणामी अशा भेसळयुक्त दुधामुळे मानवांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.
कृत्रिम दूध कसे ओळखावे?
खूप ठिकाणी कृत्रिम दूध बनवून विकले जाते. युरिया, सोयाबीन तेल, मीठ, साखर, स्कीम मिल्क पावडर, ग्लुकोज पावडर, कॉस्टिक सोडा इत्यादी पाण्यात मिसळून कृत्रिम दूध तयार करतात. या कृत्रिम दुधाची चव थोडी कडू असते. प्यायल्यानंतर शेवटी ती जाणवते. द्रवरूप साबणासारखे ते जाणवते. गरम केल्यास पिवळे होते.
दुधातील भेसळ ओळखण्याच्या चाचण्या
दुधातील भेसळ ओळखण्याच्या चाचण्या कोणत्या आहेत, दुधातील फॅट काढणे आणि दुधातील भेसळ ओळखल्यामुळे होणारे फायदे, याविषयी सविस्तर माहिती प्रस्तुत लेखात देण्यात येत आहे.
1) पिठाची भेसळ :
दुधात काही थेंब टिंक्चर आयोडिन किंवा आयोडिन द्रावण टाकणे. निळा रंग आल्यास स्टार्च किंवा पीठ आहे असे समजावे.
2) युरियाची भेसळ :
परीक्षानळीत मोठ्या चमच्याएवढे दूध घेऊन त्यात अर्धा चमचा सोयाबीन पावडर मिसळावी. पाच मिनिटांनी लाल लिटमस पेपर टाकावा. अर्ध्या मिनिटाने लिटमस पेपरला निळा रंग आल्यास युरिया भेसळ असल्याचे समजावे.
3) वनस्पती तुपाची भेसळ :
परीक्षानळीत ३ मिली दूध घेऊन त्यात हायड्रोक्लोरिक अॅसिडचे १० थेंब व एक चमचा साखर टाकावी. लाल रंग आल्यास वनस्पती तुपाची भेसळ सिद्ध होते.
4) फॉरमॅलिनची भेसळ :
परीक्षानळीत १० मिली दूध घेऊन त्यात ५ मिली सल्फ्युरिक अॅसिड बाजूने टाकावे. जांभळ्या किंवा निळ्या रंगाची रिंग होऊन दोन थरांत दिसल्यास फॉरमॅलिनची भेसळ आहे असे समजावे.
5) रबडीमध्ये ब्लॉटिंग पेपरची भेसळ :
एक चमचा रबडी घेऊन, त्यात ३ मिली हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि ३ मिली डिस्टिल्ड वॉटर घ्यावे. मिश्रण एकत्र करावे. एकत्र करताना ग्लास रॉटला तंतू असल्यास ब्लॉटिंग पेपरची भेसळ समजावी.
6) खवा व खवायुक्त पदार्थांत पीठ (स्टार्च) भेसळ :
थोडा खवा पाण्यात गरम करून थंड करणे. त्यात आयोडिनचे काही थेंब टाकावेत. निळा रंग आल्यास पिठाची भेसळ आहे, असे समजावे.
7) तूप, कंडेन्स्ड मिल्क, कॉटेज चीज, खवा, दूध पावडर यात कोल्टार डायची भेसळ:
५ मिली सल्फ्युरिक अॅसिड एक चमचा नमुन्यात टाकून विरघळू द्यावा. त्यासाठी परीक्षानळी हलवावी. त्यात गुलाबी रंग भेसळ दर्शवतो.
8) गोड दह्यामध्ये वनस्पती तुपाची भेसळ :
एक चमचा दही परीक्षानळीत घेऊन, त्यात १० थेंब हायड्रोक्लोरिक अॅसिड टाकावे. पाच मिनिटे एकत्र केल्यानंतर लाल रंग आल्यास वनस्पती तुपाची भेसळ असल्याचे ओळखावे.
9) तुपामध्ये बटाट्याचा चुरा, रताळे, पीठ यांची भेसळ :
तुपाच्या नमुन्यात आयोडिनचे काही थेंब टाकल्यास तपकिरी रंगाचा बदल निळ्या रंगात झाल्यास भेसळ आहे हे समजावे.
युरिया, स्टार्च, साखर, ग्लुकोज, न्युट्रलायझर, खराब पाणी, हायड्रोजन पेरॉक्साईड, वनस्पती तुपाची दुधातील भेसळ उजव्या परीक्षानळीत स्पष्ट होते.
दुधातील फॅट काढणे :
या चाचणीत दुधातील एकूण फॅट किती आहे ते कळते. यासाठी सल्फ्युरिक अॅसिड, अमाईल अल्कोहोल, ब्युट्रोमीटर, गरबर मशीन, रबर स्टॉपर आवश्यक आहेत.
सल्फ्युरिक अॅसिड फॅट चाचणीसाठी घेताना ८० टक्के सल्फ्युरिक अॅसिड आणि ८० टक्के डिस्टिल वॉटर घ्यावे.
ब्युट्रोमीटर या काचेच्या नळीत १० मिली सल्फ्युरिक अॅसिड घ्यावे. त्यानंतर १०.७५ मिली दूध बारीक नळीने ओढून घेऊन ब्युट्रोमीटरमध्ये सोडावे. यानंतर १ मिली अमाइल अल्कोहोल मिसळावे. नंतर रबर स्टॉपर ब्युट्रोमीटरला घट्ट बसवतात. यानंतर ब्युट्रोमीटर ८-१० वेळा उलटसुलट फिरवतात.
यानंतर ब्युट्रोमीटर ६५ अंश सेल्सिअस तापमानास दहा मिनिटे ठेवतात. यानंतर ब्युट्रोमीटर गरबर मशीनमध्ये ठेवतात. सदर मशीन ११०० आरपीएम गतीने पाच मिनिटे फिरवतात.
यानंतर ब्युट्रोमीटर काढून नळीवरच्या आकड्यांवरील पिवळसर (कोरड्या चाऱ्याच्या रंग) द्रावण किती आहे हे मोजतात.
दुधातील भेसळ ओळखल्यामुळे होणारे फायदे
- शुद्ध व भेसळयुक्त दुधाचा फरक समजतो.
- भेसळयुक्त दुधापासून होणारे नुकसान टाळता येते.
- भेसळयुक्त दुधामुळे होणारी ग्राहकांची फसवणूक टाळता येते.
- शुद्ध व गुणवत्तायुक्त दूध मिळण्यास मदत होते.
- शुद्ध व गुणवत्तापूर्ण दुधाला बाजारात चांगला दर मिळतो.
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर