Friday, December 6, 2024

Top 5 This Week

Related Posts

हायड्रोपोनिक्स तंत्राने चारा निर्मिती फायदेशीर

हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान हे जुने असले तरीही आजच्‍या परिस्थितीसाठी  या तंत्रज्ञानाची फार उत्‍सुकता असून त्‍याची गरजही आहे. त्‍यामुळे या तंत्रामध्‍ये मागील 40 वर्षांपेक्षा झपाट्याने प्रगती होत आलेली आहे. यामध्‍ये महागड्या मशीनपासून ते घरगुती ग्रीनहाऊसमध्‍ये हायड्रोपोनिक्स पद्धतीने उत्पादन घेण्‍यास सुरूवात झाली आहे.

यूरोप व कॅनडा हे हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरण्यास पुढे येत असून डच तंत्रज्ञांनी यात आघाडी घेतली आहे. हॉलंड देशात एकूण दहा हजार हेक्‍टरपेक्षा जास्‍त क्षेत्र हे हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्‍पादन घेण्‍यासाठी वापरले जाते. अमेरिकेतही यामध्‍ये प्रगती होत आहे तर चीनमध्‍ये दोन हजार एकरावर हायड्रोपोनिक्स पद्धतीने उत्‍पादन घेतले जाते.

आपण हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्‍पादन घेतले तर आपण शेतजमिनीवर पडणारा अतिरिक्‍त भार कमी करू शकतो. या पद्धतीमुळे आज जनावरांची हिरव्‍या चाऱ्याअभावी कमी होणारी उत्‍पादकता व दुग्‍धोत्‍पादनात शेतकऱ्यांचा होणारा वाढता तोटा थांबवून आर्थिकदृष्ट्या फायद्याच्‍या दिशेने नक्‍कीच वाटचाल करता येईल, यात तिळमात्रही शंका वाटत नाही.

अलीकडे दिवसेंदिवस पावसाचाही शाश्‍वती राहिलेली नाही. त्‍यामुळे कधी-कधी तर सरकारला चारा छावणी उघडण्‍याची वेळ येते; परंतु जरी आपण छावणीमध्‍ये विकत चारा आणू, तरी पैसे देऊनही हिरवा चारा उपलब्‍ध कुठे होणार, हाही प्रश्‍न महत्‍वाचा आहे. अशा कमी पर्जन्‍यमान असणाऱ्या भागात कमीत किमी म्‍हणजे स्‍थानिक भागात उपलब्‍ध होणाऱ्या साधनसामग्रीचा वापर करून अद्ययावत हायड्रोपोनिक्स चारा युनिट विकसित केली तर एक चांगली भरवशाची चाऱ्याचे उत्‍पादन देणारी यंत्रणा निर्माण होईल.

हायड्रोपोनिक्स उत्‍पादन पद्धत ही आजच्‍या शेतीशास्‍त्रातील एक अद्ययावत व प्रगत अशी पीक उत्‍पादन पद्धत आहे, असे म्‍हटले तर वावगे ठरणार नाही. यामध्‍ये ग्रीनहाऊस व नियंत्रित वातावरणात उच्‍च नैसर्गिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियंत्रित हवा, तापमान, पाणी व प्रकाश यांचा योग्‍य मिलाप साधल्‍याने या पद्धतीने सर्वसाधारण पद्धतीपेक्षा चांगल्‍या गुणवत्तेचा चारा उत्‍पादन करणे शक्‍य होते. तसेच बाहेरच्‍या वातावरणाचा त्‍याच्‍यावर काहीही परिणाम होत नाही. हा चारा सेंद्रिय तर असतोच; परंतु दर्जेदारसुद्घा असतो आणि यास फक्‍त 5 % जागा व 5 % पाणी लागते.

हायड्रोपोनिक्स तंत्राने चारा उत्‍पादन का करावे ?  

उत्‍पादन :

हायड्रोपोनिक्स तंत्रानेनियंत्रित वातावरणात चाऱ्याच्‍या वाढीसाठी सर्व गरजा पुरवल्‍याने एकदम चांगल्‍या दर्जाचा व वाढीव उत्‍पन्‍न देणारा चारा मिळतो.

गुणवत्ता :

हायड्रोपोनिक्स तंत्रानेघेतलेल्‍या उत्‍पादनांसाठी त्‍यांच्‍या वाढीस पोषक वातावरण दिले जाते. त्‍यामुळे तयार होणाऱ्या उत्‍पादनाची चव व उत्‍पादन हे पारंपरिक उत्‍पादन पद्धतीपेक्षा कधीही सरस असते. त्‍यामुळे हायड्रोपोनिक्स चारा जनावरास दररोजच्‍या आहारात ठेवल्‍यास गायीच्‍या दुधाची चवही गोड येते व काही अंशी दुधाच्‍या रंगातही बदल झाल्‍याचे दिसून येते.

अल्‍पभूधारक शेतकरी :

कमी जमीन असणाऱ्या अल्‍पभूधारक शेतकऱ्यांना त्‍यांचे मुख्‍य उत्‍पन्‍नाचे क्षेत्र हे पशुधनाच्‍या चाऱ्यासाठी वापरावे लागते व त्‍यांच्‍यावर इतर उत्‍पादन घेण्‍याची मोठी अडचण असते. त्‍यामुळे असे शेतकरी पशुपालन व्‍यवसाय वाढवू शकत नाहीत. अशा शेतकऱ्यांना हायड्रोपोनिक्स चारा उत्‍पादन हा चांगला पर्याय ठरु शकतो. हायड्रोपोनिक्स चारा उत्‍पादन पद्धतीने कमीत कमी क्षेत्र हे चाऱ्याखाली राहील व उर्वरित शेतजमिनीवर पशुपालक इतर पिके घेऊन त्‍यांची आर्थिक परिस्थिती सुधारु शकतात.

जमीन :

पारंपरिक चारा उत्‍पादन पद्धतीत आपण हेक्‍टरी अंदाजे 100 ते 120 टन मक्‍याचे उत्‍पादन घेऊ शकतो; परंतु हायड्रोपोनिक्स चारा उत्‍पादन पद्धतीत आपणास एवढेच उत्‍पन्‍न घेण्‍यास आपणास 0.001 हेक्‍टर (म्‍हणजे एक गुंठा) एवढी कमी जागा लागते. हे प्रमाण जर राहिले तर हे शंभर पट जास्‍त आहे.

कामकाज खर्च :

पारंपरिक चारा उत्‍पादन पद्धतीने काम करण्‍याचे प्रमाण जास्‍त आहे. यात जमिनीची नांगरणी, सपाटीकरण, वाफे बांधणी, पाणी देणे, तण काढणे, लागवड करणे, खत घालणे, कापणी करणे, वाहतूक करणे व कुट्टी करणे इत्‍यादी प्रकारची कामे करावी लागतात. सध्‍या शेती कामांसाठी मजुरांचा तुटवडा जाणवत असल्‍याने उत्‍पादन खर्चात वाढ होईल. तसेच भविष्‍यात मजूर मिळतीलच याची शाश्‍वती देता येणार नाही. बऱ्याच बागायती भागात आजच मजुरांची समस्‍या भेडसावू लागली आहे. परिणामी शेतातील कामे करणे कठीण झाले आहे.

कालावधी :

हायड्रोपोनिक्सपद्धतीने चारा उत्‍पादन घेताना कालावधीचा विचार केला तर सर्वसाधारणपणे 7 ते 9 दिवसांत चारा तयार होतो. तोच चारा आपल्‍या शेतात तयार होण्यास साधारण अंदाजे 60 ते 90 दिवस लागतो.  म्‍हणजे यात आपण वेळेचीही बचत करु शकतो. यामध्‍ये सर्व वातावरण नियंत्रित असल्‍याने चारा पिके वाढीस मदत होते व ती पूर्ण क्षमतेने वाढतात.

ऋतुमान :

या प्रकारच्‍या चारा उत्‍पादन पद्धतीत वातावरणाच्‍या परिणाम होत नसल्‍याने उत्‍पादनात कायम सातत्‍य राखले जाते. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या ऋतुमानानुसार वेगवेगळी चारा पिके घ्‍यावी लागतात; परंतु हायड्रोपोनिक्स चारा उत्‍पादन पद्धतीत आपणास हा विचार करावयाची गरज नसते.

बऱ्याच वेळेस आपणास मातीत चारापिके उत्‍पादन घेत असताना मातीतून होणाऱ्या रोगांचा परिणाम हा पीक उत्‍पादनावर होतो. परिणामी एकंदरीत चारा पिकांचे उत्‍पादन घटते व गुणवत्तेवरही वाई ट परिणाम होतो.

प्रतिष्‍ठा :

हायड्रोपोनिक्स चारा पद्धत ही सुधारित असल्‍याने हे काम करण्‍यास माणसेही सहज उपलब्‍ध होतात. जास्‍त शोधाशोध करावी लागत नाही. तसेच शेतात काम करण्‍याऐवजी हे काम जरा प्रतिष्‍ठेचे समजले जाते.

विजेचा वापर :

शेतीला जलसिंचनासाठी जास्‍त क्षमतेची विद्युत पंप चालवण्‍यासाठी थ्री फेजची गरज असते. आजकाल शेतीसाठी थ्री फेज वीजपुरवठा ही फार मोठी समस्‍या जाणवत आहे. बऱ्याच वेळेस विद्युतपुरवठा हा अनियमित व वेळेवर नसतो. त्‍यामुळे त्‍याचा परिणाम पीक उत्‍पादनावर होतो. तसेच यावर होणारा खर्चही मोठा असतो.

जागेची निवड :

चारापीक वाढीसाठी मातीची गरज नसल्‍याने आपणास टेरेस किंवा ज्‍या ठिकाणी आपण चारापिके घेऊ शकत नाही, अशा जागेतही चांगले व फायदेशीर चारा उत्‍पादन घेता येऊ शकते.

पाणी बचत :

सर्वसाधारणपणे आपणास 1 किलो चारा पिकाचे उत्‍पादन नियिमत पद्धतीने घेण्‍यास 60 ते 80 लिटर पाण्‍याची आवश्‍यकता असते; परंतु हे उत्‍पादन जर हायड्रोपोनिक्स युनिटद्वारे घेतले तर आपणास पुनर्वापर पद्धतीत दीड ते दोन लिटर व साध्‍या पद्धतीत 2 ते 3 लिटर पाण्‍यात 1 किलो चारा उत्‍पादन घेता येऊ शकते. या पद्धतीने आपण पाण्‍याचे दुर्भिक्ष असलेल्‍या भागातसुद्घा कमी पाण्‍याचा वापर करुन आवश्‍यक हिरव्‍या चाऱ्याचे प्रमाणात पावसाची अनियमितता आढळते. तसेच पश्चिम महाराष्‍ट्रातील बऱ्याच भागात चारा जर हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्‍पादन घेण्‍याची पद्धती विकसित केली तर दहा जनावरांसाठी रोज 150 किलो हिरवा चारा तयार करण्‍यासाठी आपणास रोज फक्‍त 200 ते 250 लिटर पाण्‍याची आवश्‍यकता आहे. या पद्धतीने पाण्‍याची बचत करता येईल. 

आहारातील सातत्‍य :

पारंपरिक चारा उत्‍पादन पद्धतीत आपण एकच चारा पीक एकसारखे घेऊ शकत नाही. यामुळे जमिनीचा पोत घसरण्‍याची शक्‍यता असते. त्‍यामुळे कधी एकदल तर कधी द्विदल अशी पीक पद्धती वापरली जाते. यामुळे उत्‍पादनात सातत्‍य राहते. तसेच हायड्रोपोनिक्स चारा उत्‍पादन यंत्रात आपणास अशा प्रकारच्‍या बदलांची आवश्‍यकता नसते. आपण एकच पीक वर्षभर घेऊ शकतो. त्‍यामुळे जनावरांच्‍या आहारातील सातत्‍य ठेवता येते. यामध्‍ये पिकांची वाढ ही एकसारखीच होते आणि एकाच वेळेस म्‍हणजे ठरावीक 7 ते 9 दिवसांच्‍या कालावधीत जनावरांना खाण्‍यासाठी ते तयार होते. 

ऊर्जाबाबत :

पारंपरिक चारा उत्‍पादन पद्धतीमध्‍ये चारा पिकास वातावरणाचा ताण सहन करावा लागतो. त्‍यामुळे बरीच ऊर्जा ही रोगापासून बचाव करणे व इतर ताण सहन करण्‍यात वापरली जाते. तसेच अशा पिकास पाणीही कमी जास्‍त होते. परिणामी पाहिजे त्‍या प्रमाणात ऊर्जेचे रूपांतर होत नाही. हायड्रोपोनिक्स चारा तंत्राने पीक वाढत असताना त्‍यांना वातावरणाचा ताण सहन करण्‍यासाठी जास्‍त ऊर्जा उत्‍पादन व गुणवत्ता वाढीसाठी वापरतात, त्‍यामुळे हायड्रोपोनिक्स उत्‍पादन पद्धतीत उत्‍पादन जास्‍त मिळते.

रासायनिक अंश :

पारंपरिक चारा पिके उत्‍पादनात पिके मातीतील अन्‍नद्रव्‍ये घेतात. मातीतील रासायनिक घटकांचे काही अंश यामध्‍ये उतरण्‍याची शक्‍यता असते. तसेच वातावरणाचा ताण सहन करताना अशी पिके बऱ्याच रोगांना बळी पडतात. अशा रोगांवर नियंत्रण आणण्‍यासाठी आपणास वेगवेगळी रासायनिक कीडनाशके वापरणे भाग पडते व त्‍याचे काही अंश त्‍या चाऱ्याच्‍या रुपाने जनावरांच्‍या शरीरात व नंतर दुधात येण्‍याची शक्‍यता असते.

पिकाची चांगली वाढ होण्‍यासाठी जी वेगवेगळी रासायनिक खते वापरली जातात, त्‍या खतातील अंश हे चाऱ्यामध्‍ये उतरण्‍याची शक्‍यता असते. तसेच ज्‍या भागात औद्योगिक कारखानदारी जास्‍त आहे, अशा भागात जड धातूंचे प्रमाण जमिनीत जास्‍त असण्‍याची शक्‍यता जास्‍त असते. आरोग्‍यास घातक असणारे असे जड धातू चाऱ्यामार्फत जनावरांच्‍या शरीरात व नंतर दुधाच्‍या माध्‍यमातून मानवी शरीरास अपायकारक ठरु शकतात.

हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती युनिटमध्‍ये नियंत्रित घटकांचा वापर करण्‍यात येत असल्‍याने त्‍याचे हानीकारक अंश त्‍यामध्‍ये येऊ नयेत याची दक्षता घेतली जाते. तसेच आपण वातावरण नियंत्रण करण्‍यासाठी यंत्रणा वापरली. असल्‍याने पिकास पूरक वातावरण असते. त्‍यामुळे पिकावर ताण येत नसून पिके रोगप्रतिकारक तयार होऊन त्‍यांच्‍यावर रोगाचा प्रादुर्भाव होण्‍याची शक्‍यता फार कमी असते. हायड्रोपोनिक्स चारा उत्‍पादनात घातक अंश राहणार नाही याची दक्षता घेतलेली असते. म्‍हणूनच आपण या उत्‍पादनास सेंद्रीय उत्‍पादन असेही म्‍हणू शकतो. 

हायड्रोपोनिक्स चारा उत्पादनामुळे होणारे फायदे :

  • जनावरांना रसायनविरहित शुद्ध व गुणवत्तापूर्ण चारा  मिळतो.
  • वातावरणातील आर्द्रतेचा वापर करून पिकांची सुदृढ वाढ होत असल्याने अतिरिक्त पाण्याचा वापर टाळला जातो.
  • हिरव्‍या चाऱ्याअभावी कमी होणारी उत्‍पादकता आणि दुग्‍धोत्‍पादनात शेतकऱ्यांचा होणारा तोटा थांबविता येतो.
  • इतर पारंपरिक चारा पिकांच्या तुलनेत  हायड्रोपोनिक्स पद्धतीने तयार केलेला चारा हा उत्तम आहे.
  • दुग्धव्यवसायिकांना हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा निर्मिती करणे अधिक फायदेशीर ठरते.
  • दुधाची चव व गुणवत्ता या पद्धतीने उत्तम राखली जाते.
  • वाढत्‍या चारा समस्‍येवर हायड्रोपोनिक्स हा एक उत्तम पर्याय आहे.
  • कमीधारण क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हायड्रोपोनिक्स हे चारा निर्मितीसाठी एक वरदान आहे.
  • हायड्रोपोनिक्स चारा निर्मितीसाठी खर्च कमी येतो.  
  • हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा निर्मिती ही आर्थिक दृष्ट्या फायदेशीर करता येते.

विषेष संदर्भ :

  1. डॉ. एस. पी. गायकवाड (2017),  कमी खर्चाचे चारा उत्‍पादन तंत्र हायड्रोपोनिक्स, सकाळ प्रकाशन, पुणे
  2. दैनिक ॲग्रोवन : हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती तंत्र, सकाळ प्रकाशन, पुणे.

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर तथा वेबसाईट ॲडमीन : https://www.agrimoderntech.in/

हायड्रोपोनिक्स तंत्राने चारा निर्मिती फायदेशीर हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribes, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Read More Article

पशुखाद्य निर्मिती : समस्या व उपाय

हायड्रोपोनिक चारा युनिटच्या प्रमुख अडचणी

दूध उत्पादनासाठी हिरव्या चाऱ्याची गरज

हायड्रोपोनिक चाऱ्याचा जनावरांच्या आहारात वापर

हायड्रोपोनिक चारा युनिटच्या प्रमुख अडचणी

admin
adminhttps://www.ksagrowon.in
Kishor Motiram Sasane, (B.Sc. Agriculture)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles