ज्वारी हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. महाराष्ट्रातील ज्वारी पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे, कारण अलीकडे शेतकरीवर्ग हा नगदी पिके उदा. सोयाबीन, ऊस व भाजीपाला वर्गीय इत्यादी घेण्याकडे अधिक कल वाढत आहे. तसेच रब्बी ज्वारी सुधारीत पद्धतीने लागवड करण्याचा अभाव यात प्रामुख्याने दिसून येतो, यामध्ये खतांचे संतुलित वापर न करणे, पीकसंरक्षण व काढणी पश्चात तंत्रज्ञान अभाव व ज्वारीला बाजारपेठेत हमीभाव मिळत नसल्यामुळे रब्बी ज्वारीची शेती करणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया परवडत नसल्यामुळे रब्बी ज्वारी खालील उत्पादन व प्रति हेक्टरी उत्पादकता कमी येत आहे.
महाराष्ट्रात खरीप हंगामात बहुतांश मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व कोकण भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीपासोबत रब्बीचे उत्पादन होईल, असे अपेक्षित आहे तसेच रब्बी ज्वारीचे उत्पादन वाढण्यास निश्चितच मदत होईल. ज्वारी हे पीक कोरडवाहू शेतीसाठी अत्यंत कमी जोखमीचे आहे. मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते.
दर्जेदार रब्बी ज्वारीचे उत्पन्न वाढविण्यासाठी रब्बी ज्वारीचे पंचसूत्री तंत्रज्ञानाचा अवलंब करून मूलस्थानी जलसंधारण, योग्य वेळी पेरणी, पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया, जमिनीच्या प्रकारानुसार सुधारित वाणांची निवड, रासायनिक व विद्राव्य खतांचा संतुलित वापर, योग्य वेळी पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि काढणीपश्चात्त सुधारित तंत्र इत्यादीचा योग्य पद्धतीने समन्वय साधल्यास रब्बी ज्वारीचे भरघोस उत्पादन मिळविणे शक्य होते.
जमीन कशी असावी ?
रब्बी ज्वारीसाठी मध्यम ते भारी जमिनीत ओलावा जास्त काळ टिकवून राहत असल्याने अशा जमिनीत ज्वारी पेरणी करावी. सामान्यपणे ५.५ ते ८.५ सामू असणाऱ्या जमिनीत ज्वारी पीक घेता येते. रब्बी ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात जिरायती किंवा कोरडवाहू क्षेत्रावर केली जाते. जिरायती क्षेत्रावर जास्त उत्पादन येण्यासाठी जमिनीची निवड योग्य वाणानुसार करावी.
पूर्व मशागत कशी करावी ?
- पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी उन्हाळ्यात शेती मशागतीची कामे उतारास आडवी करावीत. नांगरट झाल्यानंतर हेक्टरी १० ते १२ गाड्या शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.
- कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन काडी-कचरा, धसकटे व इतर अवशेष वेचून जमीन साफ करावी. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी उतारावर वाफे तयार करावेत. (३.६० X ३.६० चौ.मी. आकाराचे) वाफे तयार करतांना सारा यंत्राने सारे करुन त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार करता येतात.
- ट्रॅक्टरचलीत यंत्राने एकावेळी (६. ०० X २.०० चौ.मी.) आकारचे वाफे तयार करता येतात. वाफे रब्बी ज्वारीच्या पेरणीपूर्वी ४५ दिवस अगोदर तयार करावेत म्हणजे १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर हा कालावधी रब्बी ज्वारीची कोरडवाहू क्षेत्रावर पेरणी करण्याची शिफारस तज्ञांनी केलेली आहे.
- पेरणीच्या वेळी वाफे मोडून पेरणी करावी व पुन्हा सारा यंत्राच्या सहायाने गहू-हरभरा पिकासारखे वाफे पाडून आडवे दंड पाडावेत म्हणजे पेरणीनंतर पाऊस पडल्यावर तो आडवून जिरवता येईल. या तंत्राला मूलस्थानी पाणी व्यवस्थापन असे म्हटले जाते. या तंत्रामुळे रब्बी ज्वारीचे सुमारे ३०-३५ टक्के उत्पादनात वाढ होते.
बीजप्रक्रिया कशी करावी ?
रब्बी ज्वारीचे दर्जेदार उत्पन्न घेण्यासाठी किंवा जमिनीत उपद्रवी कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करणे आवश्यक असते. म्हणून रब्बी ज्वारीस पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक (३०० मेश पोताचे) चोळावे तसेच २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर व पी.एस.बी. कल्चर चोळावेत. थोडा वेळ बियाणे सुकवून लगेच पेरणी प्रकिया चालू करावी.
पेरणी प्रक्रिया कशी करावी ?
- रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पावसाच्या ओलीवर ५ सें.मी. खोलीपर्यंत करावी.
- ज्वारीचे अपेक्षित उत्पादनासाठी प्रती हेक्टरी १.४८ लाख रोपे असणे आवश्यक असते. त्याकरिता ज्वारीची ४५ X १५ सें.मी. असे अंतरावर पेरणी करावी करावी.
- बागायत ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी ज्वारीची पेरणी ४५ X १२ सें.मी. अंतरावर करावी. जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करुन हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे.
- पेरणीसाठी दोन चाड्याची पाभर वापरून एकाच वेळी खत व बियाणे पेरावे.
पीक फेरपालट कशी करावी ?
खरीपात मूग, उडीद, भुईमूग आणि सोयाबीन ही पिके घेऊन नंतर रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी करावी, यामुळे २० ते ३० किलो नत्राची बचत होते. तथापि, सोयाबीन-रब्बी+ज्वारी हा पीक क्रम विशेषतः बागायतीसाठी आर्थिकदृष्टया उत्पादनासाठी फायदेशीर ठरतो.
आंतरमशागत कधी करावी ?
- पिकाच्या सुरुवातीच्या ३५ ते ४० दिवसात तण व पिकामध्ये जमिनीतून अन्नद्रव्य शोषणासाठी तीव्र स्पर्धा असते. त्यामुळे सुरुवातीस ३५ ते ४० दिवसात पीक तणविरहित ठेवणे महत्वाचे आहे.
- पेरणीनंतर १ ते २ वेळा खुरपणी करून २ वेळा कोळपणीचे कामे करावे. पहिली कोळपणी पेरणीनंतर सर्वसाधारणपणे ३ आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने, दुसरी पेरणीनंतर ५ आठवड्यांनी पासेच्या कोळप्याने आणि तिसरी ८ आठवड्यांनी दातेरी कोळप्याने करावी.
- शेवटची कोळपणी वेळी कोळप्याला दोरी बांधून कोळपणी केल्यास पिकांच्या मुळांना मातीची भर पडेल व पिकांना मातीचा आधार दिला जाईल.
कोरडवाहू क्षेत्रात आच्छादनाचा वापर का करावा ?
जमिनीतून ६० ते ७० टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे नाहीसा होतो. हा ओलावा टिकविण्यासाठी शेतातून काढलेले तण, तूरकाटया यांचा वापर आच्छादनासाठी करावा. आच्छादन ज्वारी पेरल्यापासून ५० दिवसांच्या आत टाकणे महत्वाचे आहे. आच्छादनामुळे उत्पादनात १४ टक्क्यापर्यंत वाढ होते असे अनेक प्रयोगाअंती आढळून आले आहे.
रब्बी ज्वारीस पाणी व्यवस्थापन कसे करावे ?
- रब्बी ज्वारीस एखादे संरक्षित पाणी उपलब्ध झाल्यास पीक गर्भावस्थेत असतांना पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असतांना पेरणीनंतर ५० ते ६० दिवसांनी द्यावे.
- दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे. बागायती ज्वारीमध्ये मध्यम जमिनीत तिसरे पाणी पीक फुलोऱ्यात असतांना पेरणीनंतर सर्वसाधारण ७० ते ७५ दिवसांनी आणि कणसात दाणे भरतांना पेरणीनंतर सर्वसाधारण ९० ते ९५ दिवसांनी द्यावे. जेणेकरून पीक उत्पादनात चांगली वाढ होईल.
रब्बी ज्वारीची काढणी कशी करावी ?
- रब्बी ज्वारीचे पीक जातीपरत्वे ११० ते १३० दिवसांत काढणीस तयार होते. ज्वारी काढणीच्या वेळी कणसातील दाणे टणक होतात.
- ज्वारी पिठाळ लागल्यानंतर ज्वारीचे बारकाईने निरीक्षण केल्यास दाण्याच्या टोकाकडील भागाजवळ काळा ठिपका आढळून आल्यास रब्बी ज्वारीची काढणी मजूराकडून करावी.
- ज्वारी काढणीनंतर सर्वसाधाररण ८ ते १० दिवस कणसे उन्हात वाळवून मळणी करावी. मळणी यंत्रणाच्या साह्याने धान्य उफणनी करुन तयार झाल्यानंतर त्याला पुन्हा साठवणुकीपूर्वी उन्हात चांगले वाळवावे.
रब्बी ज्वारीचे उत्पन्न किती मिळते ?
रब्बी ज्वारीच्या पंचसूत्री तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन घेतल्यास ज्वारीचे प्रती हेक्टरी हलक्या जमिनीवर ८-१० क्विंटल, मध्यम जमिनीवर २०-२५ क्विंटल, भारी जमिनीवर २५-३० क्विंटल उत्पादन मिळते. त्याचबरोबर कोरडवाहू क्षेत्रात धान्यापेक्षा दुप्पट तर बागायतीत अडीच ते तीनपट कडब्याचे उत्पादन मिळते.
डॉ. योगेश सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda)
रब्बी ज्वारीचे पंचसूत्री तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करून सहकार्य करावे. धन्यवाद !