Friday, December 6, 2024

Top 5 This Week

Related Posts

कोरडवाहू करडई लागवड कशी करावी ?

करडई हे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. सध्याचे तेलाचे वाढीव दर लक्षात सोयाबीन, भुईमूग व सुर्यफूल पिकानंतर दुय्यम म्हणून करडई पीक घेतले जाते. कारण इतर महत्त्वाच्या पिकाच्या तुलनेत करडई पिकाचे उत्पादन कमी असल्याकारणाने या पिकाच्या लागवडीकडे फारशे शेतकरी वळत नाही. परंतु करडई या पिकापासून उत्तम दर्जेचे तेल व जनावरांसाठी लागणारी पेंड मुबलक प्रमाणात मिळत असल्यामुळे या पिकास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.

प्रस्तुत लेखाआधारे आपणास करडई पिकाची कोरडवाहू लागवड कशी करावी या बद्दल माहिती मिळणार नाही. सदर माहितीच्या आधारे कोरडवाहू जमिनीवर चांगले करडईचे उत्पादन घेता येणार आहे. त्यामुळे प्रती हेक्टरी करडई उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास चालना मिळेल.

जमीन कशी निवडावी ?

करडईच्या पिकास मध्यम ते भारी (खोल) जमीन वापरावी. ४५ सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल जमिनीत पीक चांगले येते. त्याचप्रमाणे जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. पाणी साठवून राहिल्यास करडईच्या पिकास अपाय होतो. थोड्याफार चोपण जमिनीतही हे पीक येवू शकते.

पूर्वमशागत कशी करावी ?

करडईसाठी भारी जमिनीत तीन वर्षातून एकदा खोल नांगरट करावी व हेक्टरी ५ टन शेणखत (शेतकऱ्याकडे उपलब्ध असल्यास) टाकावे. दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या (उभ्या आणि आडव्या) देवून जमीन भुसभूशीत करावी.

पेरणीची कशी करावी ?

करडईची पेरणी योग्य वेळी करणे फार महत्वाचे आहे. लवकर पेरणी (सप्टेंबर पहिला पंधरवडा) केल्यास पिकाचे पानावरील ठिपके या बुरशीजन्य रोगामुळे फार नुकसान होते आणि पर्यायाने उत्पादनात घट येते. या उलट उशिरा पेरणी केल्यास (ऑक्टोबरचा दुसरा आठवड्यानंतर) पीक वाढीची अवस्था थंडीच्या काळात आल्यामुळे माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि उत्पादनात घट येते. त्यासाठी करडईची पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. बागाईत करडईची पेरणी ऑक्टोबर अखेरपर्यंत करावी.

पेरणीचे अंतर किती ठेवावे ?

करडई पिकाचे कोरडवाहू क्षेत्रात दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. आणि दोन रोपातील अंतर २० सें.मी. ठेवावे.

पेरणी कशी करावी ?

करडई या तेलबिया पिकाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी किंवा ट्रॅक्टरचलित बहुपीक पेरणी यंत्राचा वापर करावा.

बीजप्रक्रिया कशी करावी ?

अँझोटोबॅक्टर अथवा अँझोस्पीरीलम २५० ग्रॅम अधिक पी.एस.बी. २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास वापरल्यास हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन उत्पादनात वाढ होते.

आंतरपीक कोणते घ्यावे ?

शक्यतो करडई पिकामध्ये आंतरपीक खूप कमी प्रमाणात घेतले जाते. यामध्ये हरभरा + करडई (६ : ३) आणि जवस + करडई (४ : २) या आंतरपीक पध्दतीचा वापर करावा.

खत व्यवस्थापन कसे करावे ?

करडई हे पीक रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते. ५० किलो नत्र (११० किलो युरीया) आणि २५ किलो स्फुरद (१५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्टरी देणे आवश्यक आहे. ही खते पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावीत. बागायती करडई पिकास ६० किलो नत्र + ३० किलो स्फुरद प्रतिहेक्टरी द्यावे.

आंतरमशागत कशी करावी ?

उगवणीनंतर १० ते १२ दिवसांनी या पिकाची विरळणी करणे आवश्यक आहे. विरळणी करताना चांगली जोमदार रोपे ठेवावी. दोन रोपांमधील अंतर २० से.मी. ठेवावे. रब्बी हंगामात गरज असल्यास एखादी खुरपणी करावी. दोन ते तीन कोळप्याच्या पाळ्या देणे अतिशय गरजेचे आहे. पहिली कोळपणी ३ ऱ्या आठवड्यात फटीच्या कोळप्याने, दुसरी कोळपणी ५ व्या आठवड्यात अखंड पासाच्या कोळप्याने व तिसरी कोळपणी ८ व्या आठवड्यात दातेरी कोळप्याने करावी.

पाणी व्यवस्थापन कसे करावे ?

करडई हे पीक अवर्षण प्रतिकारक असल्यामुळे या पिकाच्या वाढीस पाणी कमी लागते. मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास करडईच्या पिकास पेरणी नंतर पाणी देण्याची गरज भासत नाही. कालांतराने ओलावा कमी झाला आणि पाणी देण्याची सोय असेल तर पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी जमिनीस तडे जाण्यापूर्वी एक संरक्षित पाणी देणे अधिक चांगले. दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात येताना ५५ ते ६० दिवसांनी द्यावे. पिकास पाण्याचा जास्त ताण पडू देऊ नये. तसेच भेगा पडल्यानंतर पाणी दिले असता पाणी जास्त प्रमाणात जमिनीत मुरते. जास्त पाण्यामुळे पीक मोठ्या प्रमाणात मर रोगास बळी पडते. म्हणून करडई पिकास हलके पाणी द्यावे.

पीक संरक्षण कसे करावे ?

करडई पिकास मुख्यतः मावा या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो करडईची पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात केली असता या किडीचा प्रादुर्भाव बराच कमी होतो. या किडीच्या नियंत्रणासाठी मावा दिसून आल्यानंतर डायमेथोएट ३०% ई.सी. ७२५ मि.ली. ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.

काढणी कशी करावी ?

साधारणपणे १३० ते १३५ दिवसात करडईचे पीक पक्व होते. पाने व बोंडे पिवळी पडतात. पिकाची काढणी सकाळी करावी. हवेत आर्द्रता जास्त असल्याने दाणे गळत नाही व हाताला काटे टोचत नाहीत. कापणीनंतर झाडांची कडपे रचून पेठे करावीत. ते पूर्ण वाळल्यानंतर काठीने बडवून काढावे व नंतर उफणणी करून बी स्वच्छ करावे. काढणी गव्हाच्या एकत्रित काढणी व मळणी यंत्राने करावी. या यंत्राने काढणी अत्यंत कमी खर्चात आणि कमी वेळात करता येते व त्यापासून स्वच्छ माल मिळतो. करडई काढणीसाठी एकत्रित काढणी व मळणी यंत्राचा प्राधान्याने वापर करून खर्च व वेळ वाचवता येतो.

उत्पादन किती मिळते ?

मध्यम जमिनीत वरील कोरडवाहू तंत्राचा अवलंब करुन लागवड केल्यास प्रति हेक्टरी १२ ते १४ क्विंटल आणि खोल जमिनीत १४ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते.

डॉ. योगेश सुमठाणे(Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda)

कोरडवाहू करडई लागवड कशी करावी हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करून सहकार्य करावे. धन्‍यवाद !

admin
adminhttps://www.ksagrowon.in
Kishor Motiram Sasane, (B.Sc. Agriculture)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles